खानापूर (जि. बेळगाव) शहरातील हायटेक बस स्थानकाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. पण निविदा प्रक्रियेचे काम अर्धवट राहिल्याने काम रेंगाळले आहे. कर्नाटक राज्य सरकार जाणीपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.
गेल्या सुमारे 8 वर्षापासून दुर्लक्षित खानापूर तालुक्याचा संपूर्ण कायापालट करणे हेच आपले स्वप्न आणि ध्येय आहे. खानापूरचे प्रस्तावित बस स्थानक हा या विकास शृंखलेतील एक टप्पा आहे. परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी हे चंद्रगिरी येथील बस स्थानकाच्या प्रलंबित कामाबाबत उत्तर देत असताना आमदार डॉ. निंबाळकर यांनी खानापूर बस स्थानकाच्या प्रलंबित कामाची विचारणा करून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. निधी मंजूर होऊन देखील काम सुरू होत नसल्याने आमदार डॉ. निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. या दिरंगाईबाबत परिवहन मंत्री सवदी यांनी उत्तर उत्तर देण्याची मागणी सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांच्याकडे केली. कोरोनामुळे परिवहनाच्या उत्पन्नात घट झाली आहे. बांधकाम आणि नव्या बसस्थानकाच्या उभारणीसाठी राखीव ठेवलेले अनुदान कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च करावे लागले आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत यावर्षी बसस्थानकांची कामे मार्गी लावली जातील असे आश्वासन मंत्री सवदी यांनी दिले.
वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 7 कोटी रुपयांचे खर्चाचा खानापूर बस हायटेक स्थानकाचा आराखडा तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. केवळ आराखडा पाठवून न थांबता बसस्थानक नूतनीकरणाच्या फायलीचा सरकार दरबारी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे बसस्थानक तालुक्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे पटवून दिले होते. परिणामी राज्य सरकारने बसस्थानकाच्या नूतनीकरणाला मंजुरी दिली. वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने 6 कोटी 93 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक बसस्थानकाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.