बेळगावमध्ये १७ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या सर्व तयारी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.
लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून मंगळवार दि. २३ मार्चपासून कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी महत्वपूर्ण बैठक बोलाविली होती. या बैठकीत १७ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात तसेच निवडणूक काळात कोणत्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार, आहे याची माहिती देण्यात आली. २३ मार्च पासून निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होणार असून ३० मार्च रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मार्च ३१ रोजी अर्जाची छाननी तर ३ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस असेल. १७ एप्रिल रोजी मतदान, २ मी रोजी मतमोजणी अशापद्धतीने ४ मी रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपेल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
निवडणूक काळात सर्व प्रक्रिया शांततेत आणि योग्यरितीने पार पाडाव्यात यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. आचारसंहिता उद्यापासून लागू होईल. आचारसंहितेतील नियम प्रत्येकाने पाळावेत, अशी सूचना त्यांनी दिली. पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभागासह इतर विभागाच्या समन्वयाने हि निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, अशी सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी किंवा तक्रारीसाठी संबंधित विभागाकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
या बैठकीला उपस्थित असलेले जिल्हा पोलीस वरिष्ठ अधिकारी लक्ष्मण निंबरगी यांनी लोकसभा पोटनिवडणुकीच्या काळात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल, तसेच निवडणुकीसाठी पोलीस विभाग देखील सज्ज असल्याचे सांगितले. निवडणूक काळात जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी , अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायतीचे सीईओ एच .व्ही दर्शन आणि अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते.