रहदारी पोलिसांचे दुर्लक्ष आणि रॉंग साईडने वाहने चालविणाऱ्या अवजड वाहन चालकांचा बेदरकारपणा यामुळे बेम्को कॉर्नर, उद्यमबाग येथील सिग्नलच्या ठिकाणचा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे.
बेळगाव खानापूर मार्गाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर उद्यमबाग येथे सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली त्यामुळे वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र कालांतराने हि सिग्नल यंत्रणा वारंवार अधेमधे बंद पडू लागली आहे. त्यामुळे सिग्नल बंद असते वेळी वाहन चालक विशेष करून अवजड वाहन चालक या ठिकाणच्या रस्त्यावर रॉंग साईडने बेदरकारपणे वाहने हाकत आहेत.
परिणामी सुरळी एका दिशेने सुरू असलेल्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका देखील वाढला आहे. समोरून रॉंग साईडने येणारे दहा-बारा चाकी अवजड वाहन पाहून अन्य वाहनांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी थांबावे लागत असल्यामुळे संबंधित वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बेम्को कॉर्नर उद्यमबाग येथील सिग्नलच्या ठिकाणी रहदारी पोलीस असतात. मात्र हे पोलीस रहदारी नियंत्रणाकडे लक्ष देण्याऐवजी वाहनचालकांकडून दंडाच्या स्वरूपात पैसे उकळण्यामध्येच अधिक व्यस्त असतात, असा आरोप आहे. रहदारी पोलिसांचे हे दुर्लक्ष पथ्यावर पाडून घेताना अवजड वाहन चालक बेधडकपणे एकेरी वाहतूक सुरू असलेल्या मार्गावर आपले वाहन घुसवितात.
परिणामी समोरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या या अवजड वाहनांमुळे एकेरी वाहतुकीच्या रांगेत असलेल्या सर्वच वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे सदर मार्गावर अपघाताची शक्यता देखील वाढली आहे.
तेंव्हा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेम्को कॉर्नर उद्यमबाग येथील रस्त्यावर चुकीच्या दिशेने बेदरकार वाहने चालविणाऱ्या अवजड वाहन चालकांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.