वाचनाला एक वय असतं. तेव्हा मुलांनी आपण काय वाचावे हे ठरवून स्वतः लिहिते बनले पाहिजे, असे मार्गदर्शनपर विचार हलकर्णी येथील कवी साहित्यिक व वक्ते प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी व्यक्त केले.
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित 20 व्या मराठी साहित्य संमेलन व मराठी भाषा दिन कार्यक्रमाप्रसंगी संमेलनाध्यक्ष या नात्याने डॉ. पोतदार बोलत होते. कुसुमाग्रज हे सामाजिक मूल्य जपणारे कवी होते. भाषा कोणतीही असो आपण तेवढ्या भाषांशी संपर्क वाढविला पाहिजे आणि ती भाषा कागदावर आणली पाहिजे. लेख, काव्यलेखन संहिता लेखन केले पाहिजे दुःखाला ही चिमटीत पकडून त्याचे फुलपाखरू करता येते. यासाठी दुःखात सुख शोधा. इतक्या बालवयात कविता साहित्य व इतर गोष्टी सादर करणारी ही मुलेच उद्याचे साहित्यिक आहेत असे सांगून डॉ चंद्रकांत पोतदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
कवी कृ. ब. निकुंब साहित्यनगरी गोगटे रंगमंदिर (स्कूल ऑफ कल्चर) येथे आज शनिवारी सकाळी 9:30 ते दुपारी 2 या कालावधीत हे 20 वे मराठी बाल साहित्य संमेलन उस्फुर्त प्रतिसादात पार पडले. संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे हलगा येथील बालरोगतज्ञ डॉ. केदार सामजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. तत्पूर्वी संमेलनाध्यक्ष डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या हस्ते कुसुमाग्रज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अडत व्यापारी शंकरराव पाटील, गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात मराठी विद्यानिकेतन मध्येच शिक्षण घेतलेल्या डॉ. केदार सामजी यांनी शाळेबद्दल प्रशंसोद्गार काढून आज आपल्या शाळेत आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून पुरवल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे बाल वयातील मुलांच्या शारीरिक वाढीबद्दल मार्गदर्शन केले. मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीत आणि मराठी अभिमान गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी, खासदार सुरेश अंगडी, गायक एस. पी. बालसुब्रमण्यम, शिक्षण तज्ञ लता साठे, ज्योत्स्ना श्रावगे, विमलाताई मेणसे, शिवाजी ओऊळकर, के. एस. जोशी आदींसह सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिवंगत ज्ञात-अज्ञात व्यक्तींना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
संमेलनाच्या कथाकथनाच्या पहिल्या सत्रात प्रियांका पवार हिने “आंबोळीचे शेत” साक्षी पाटील हिने “आकाराम” अथर्व गुरव याने “आई” आणि समृद्धी पाटील हिने “कोरोना लग्न” या कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यंदाचे वर्ष हे बेळगावचे सुप्रसिद्ध कवी कृ. ब. निकुंब यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे दुसऱ्या सत्रात त्यांच्या निवडक कवितांवर आधारित काव्य गायनाचा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतनच्या संगीत विभागातर्फे पार पडला. तिसऱ्या सत्रात बालकवींचे कवी संमेलन झाले. त्यामध्ये सीमाभागातील शालेय विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.
संमेलनाच्या चौथ्या आणि अखेरच्या सत्रामध्ये प्रमुख पाहुणे शंकरराव पाटील यांच्या हस्ते बाल साहित्यिक, कवी आणि बाल कथाकारांना बक्षिसे देण्यात आली. कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे पालन करून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनास विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/livebelgaum/videos/497704641595075/