परिवहन कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात आले नसून डिसेंबर महिन्याचे अर्धे वेतन देण्यात आले आहे. उर्वरित वेतन लवकरच देण्यात येईल. अर्धे वेतन याआधीच दिले असून उर्वरित वेतन अर्थ विभागाशी सल्लामसलत करून, डिसेंबर, जानेवारी या दोन महिन्यांचे वेतन देण्यात येईल, असे आश्वासन लक्ष्मण सवदी यांनी दिले.
सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केली नाहीत. या पार्श्वभूमीवर परिवहन कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. फेब्रुवारी महिना आला तरीदेखील डिसेंबर महिन्याचे वेतन संपूर्णपणे देण्यात आले नाही. केवळ अर्धे वेतन देण्यात आल्याचा आरोप परिवहन कर्मचाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात आज विधानसौधमध्ये परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी स्पष्टोक्ती दिली असून सरकारकडे परिवहन कर्मचाऱ्यांनी केलेल्या १० मागण्यांपैकी ९ मागण्या मान्य करण्याचे ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात समिती तयार करून तीन-चार वेळा भेटीदेखील झाल्या आहेत. दोन वर्षांच्या प्रशिक्षणाची वेळ एक वर्ष करणे तसेच बाटा प्रणाली परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार कर्मचाऱ्यांवर आणि कर्मचारी सरकारवर अवलंबून आहेत. प्रत्येकजण हा कुटुंबाप्रमाणे कार्यरत असून यामध्ये कोणीही आडकाठी करू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
कोणत्याही परिवहन कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले नाही. ज्या कर्मचाऱ्याने गुन्हा केला आहे, चूक केली आहे अशा कर्मचाऱ्याला मात्र निलंबित करण्यात आले आहे. परिवहन कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यांनी आंदोलनात करण्यात आलेल्या १० मागण्यांपैकी ३ मागण्यांचे निर्णयदेखील घोषित करण्यात आले आहेत. यासह येत्या पंधरवड्यात हे निर्णय अंमलात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती लक्ष्मण सवदी यांनी दिली.