शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बिजगर्णीसह परिसरातील गावांसाठी येत्या दोन दिवसात तात्काळ नियमित बससेवा सुरू करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा ता. पं. सदस्य नारायण के. नलावडे यांनी एका निवेदनाद्वारे एनडब्ल्यूकेआरटीसी विभागीय आयुक्तांना दिला आहे.
ता. पं. सदस्य नारायण के. नलावडे यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी सकाळी वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय आयुक्तांकडे सादर केले. याप्रसंगी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर व इतर उपस्थित होते. बिजगर्णी तसेच परिसरातील इतर गावे घनदाट लोकवस्तीची आहेत. या भागातील बहुतांश लोक गरीब आहेत. त्याचप्रमाणे या भागात विद्यार्थ्यांची संख्या देखील जास्त आहे.
शेतकरी व विद्यार्थ्यांसह या भागातील अनेकांना दररोज नियमितपणे नोकरी, कृषी उत्पादनांची विक्री, शिक्षण आणि अन्य कामासाठी बेळगावला यावे लागते. मात्र गेल्या कांही महिन्यांपासून या भागातील बस खैरे अत्यंत कमी झाले आहेत. परिणामी शेतकरी विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना बेळगावला ये-जा करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागत आहे.
बिजगर्णीसह व बेळवट्टी, बडस इनाम, गोल्याळी बाकनूर, राकसकोप, धामणे (एस.), बेळगुंदी आदी गावातील लोकांना प्रवासासाठी सरकारी परिवहन मंडळाच्या बस सेवेवर अवलंबून राहावे लागते. मात्र अलीकडे अपुऱ्या बस सेवेमुळे या सर्वांना मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यासाठी या भागांकरिता सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दररोज नियमित बससेवा सुरू होणे गरजेचे आहे. तेंव्हा वरील गावांसाठी तात्काळ येत्या दोन दिवसात बससेवा सुरू करावी.
अन्यथा शेतकरी, विद्यार्थी आदी सर्वांना घेऊन आम्हाला नाईलाजाने रास्तारोको आंदोलन छेडावे लागेल आणि याला संपूर्णपणे वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळ जबाबदार राहील, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.