सहसा साधारण रुग्णांसाठी अनेक डॉक्टर्स उपलब्ध असतात. परंतु मतिमंद रुग्णांच्या आजारासाठी डॉक्टर मिळणे अपवादच. बेळगावमधील अशाच एक डॉक्टर महिला या मतिमंद मुलांसाठी विशेष असा अभ्यासक्रम पूर्ण करून पैसे कामविण्यापेक्षाही आत्मिक समाधान मिळविण्यासाठी धडपडत आहेत.
डॉ. स्मिता प्रभू असे या महिला डॉक्टरांचे नाव असून त्यांनी मतिमंद मुलांच्या दृष्टिदोषाच्या अभ्यासक्रमात पीएचडी अभ्यासक्रम करत अशा मुलांसाठी नवी दृष्टी देण्याचे काम सुरु केले आहे. सर्वसाधारण मुले ही कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद सहजपणे देऊ शकतात. त्यांच्या भावना एकमेकांना समजावू शकतात. परंतु मतिमंद मुलांची प्रत्येक गोष्ट समजावून घेणे आणि टिक्याच ताकदीने ती त्यांना समजावून सांगणे यासाठी पराकोटीची सहनशक्ती लागते. मतिमंद मुलांची शारीरिक आणि मानसिक अवस्था लक्षात आल्यावर डॉ. स्मिता प्रभू यांनी त्यांच्या दृष्टिदोषाच्या विशेष आजारावर काम करायचं निश्चित केलं.
सुरुवातीला बालरोगतज्ञ म्हणून काम करत असलेल्या स्मिता प्रभूंनी मतिमंद मुलांसाठी विशेष पीएच.डी. ही मिळवली. त्यांच्या माध्यमातून बेळगाव आणि परिसरातील मतिमंद मुलांचा दृष्टिदोष निवारणासाठी केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात त्यांनी विशेष विभाग सुरु केला. नुकतेच या विभागाचे रितसर उदघाटनदेखील करण्यात आले.
मतिमंद मुलांच्या या त्रासाबद्दल जागृती करत, मुलांच्या पालकांना विश्वासात घेत, प्रचंड कष्ट करत त्यांनी हा पुढाकार घेतला असून केएलई संस्थेच्या माध्यमातून मतिमंद मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी त्यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. आपल्याही हातून काही वेगळं घडलं पाहिजे, असे पीएचडी अभ्यासक्रमादरम्यान त्यांना वाटू लागले. पैसे कमाविण्यापेक्षाही मानसिक समाधान मिळत असल्याची प्रांजळ कबुली डॉ. स्मिता प्रभू यांनी ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना व्यक्त केली.
केएलई संस्थेचा नेत्ररोग विभाग आणि डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळाच्यावतीने एमआरसी सीव्हीआय (सेरेब्रल व्हिज्युअल इम्प्रिमेंट) क्लिनिकची स्थापना करण्यात आली आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून अशा विशेष मुलांच्या दृष्टिदोषावर चिकित्सा करण्यात येणार आहे. मतिमंद मुलांनाही सर्वसाधारण मुलांप्रमाणे जगात वावरण्यासाठी स्थान मिळावं, जग अनुभवायची संधी मिळावी, यासाठी असाधारण कार्य करणाऱ्या डॉ. स्मिता प्रभू यांना ‘बेळगाव लाईव्ह’तर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा!