कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर चिंचली मायाक्का आणि सौंदत्ती रेणुका देवस्थान पुन्हा एकदा दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिले आहेत.
कोविड रुग्णांची संख्या घटत असल्याने तसेच यात्रेच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या दर्शनासाठी ही देवस्थाने खुली करण्यात आली होती. परंतु महाराष्ट्रातील भाविकांच्या संख्या लक्षात घेता ही देवस्थाने पुन्हा बंद करण्यात आली असून भक्तांना देवस्थानात येण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, आरोग्याधिकारी आणि पालकमंत्र्यांनी यासंदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात जरी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी बेळगाव जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मात्र स्थिर आहे. राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिन च्या आकडेवारीनुसार आज बेळगाव जिल्ह्यात १२ नव्या कोविड रुग्णांची वाढ झाली आहे.
यापैकी बेळगाव तालुक्यातील ८, गोकाक, हुक्केरी, खानापूर, रामदुर्ग तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण १२ रुग्णांचा समावेश आहे. सध्या ७२ रुग्ण अजूनही आयसोलेशन कक्षात दाखल असून आजपर्यंतच्या एकूण कोविड रुग्णांची संख्या २६८४५ इतकी आहे. तर ३४२ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र, केरळ राज्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून या राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड तांत्रिक सल्ला समितीने मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे. यानुसार कर्नाटकातही कोविड संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कोगनोळी चेक पोस्ट वर लक्ष ठेवण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी यांनी बजावले आहेत.