ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची प्रलंबित बिले येत्या 14 दिवसात अदा करा अन्यथा ऊस नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाईला सामोरे जाण्यासाठी सिद्ध रहा असा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना दिला आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या या वरिष्ठ अधिकारी आणि संचालकांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त इशारा दिला आहे. गेल्या 2020 -21 सालच्या (जाने. 2021 पर्यंत) गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची प्रलंबित ऊस बिले येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत अदा केली जावीत आणि त्याचा अहवाल सादर केला जावा, असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले.
ऊस कापणी करणाऱ्या तांड्यांकडून जादा पैशाची मागणी केली जात आहे या शेतकऱ्यांच्या तक्रारी संदर्भात बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस कापणी करणाऱ्या दांड्यांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये. त्याऐवजी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम करावे, असे सांगितले.
साखर कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर 3100 रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किमतीने विकावी. त्यापेक्षा कमी दराने विकू नये, अशी सूचना ऊस विकास आयुक्त आणि साखर संचालकांनी दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बैठकीप्रसंगी दिली.