सोन्याचे दागिने बनविण्यासाठी मालकाने दिलेले 97 लाख 64 हजार 443 रुपये किंमतीचे 2,170 ग्रॅम (सुमारे दोन किलो) 22 कॅरेट घटीव सोने घेऊन सराफ पेठेतील पश्चिम बंगालच्या कारागिरांनी पलायन केल्याची खळबळजनक घटना बिच्चू गल्ली, शहापूर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुवर्णकार कमल लालचंद पोरवाल यांनी पाच जणांवर संशय व्यक्त करून पोलिसात फिर्याद दिली आहे.
रेसकोर्स रोड, जाधवनगर येथील कमाल पोरवाल यांच्या फिर्यादीनुसार पाच कारागिरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शहाबुद्दीन नसरुद्दीन शेख (वय 36), इन्सान (वय 28), सूरज (वय 28), सैफ (वय 25) आणि जहांगीर (वय 42) अशी आरोपींची नांवे आहेत. हे सर्व कारागीर पश्चिम बंगालमधील कुलुट दक्षिण (पश्चीमपारा) महांतेश्वर व बद्रवान येथील राहणारे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कमल पोरवाल यांचा बिच्चू गल्ली शहापूर येथे सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे.
पल ज्वेलर्स या कारखान्यात शहाबुद्दिनसह सर्व पाच जण गेल्या चार-पाच वर्षापासून काम करत होते. पोरवाल यांचा 22 कॅरेटचे सोने विकत घेऊन त्यांचे दागिने मुंबईला पाठविण्याचा व्यवसाय आहे. दोन-तीन महिन्यातून एकदा झवेरी बाजार (मुंबई) येथून सोने आणून त्याचे दागिने बनवून मुंबईला पाठविण्यात येत होते.
या दागिन्यांच्या घडणावळीचा मोबदला मालक घेऊन कारागिरांना पगार दिला जात होता. नेहमीप्रमाणे अलीकडे कमल पोरवाल हे मुंबईतून 2 किलो 170 ग्रॅम सोने घेऊन आले होते. गेल्या 10 फेब्रुवारी रोजी त्यांनी शहाबुद्दीन शेखला घरी बोलावून त्याला 22 कॅरेटचे हे दोन किलो 170 ग्रॅम सोने देऊन दहा दिवसात त्याचे दागिने बनविण्यास सांगितले.
पोरवाल यांच्या घरातून सोने आणल्यानंतर पाच दिवस सर्व कारागीर कारखान्यात होते. मात्र गेल्या 15 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 01:15 वाजण्याच्या सुमारास सोने घेऊन पाचही जणांनी पोबारा केल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी गेल्या 19 फेब्रुवारी रोजी रात्री एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शहाबुद्दीनसह सर्व पाच बंगाली कारागिरांची माहिती जमविण्याचे काम हाती घेतले असून मालकाला ठकवून 2 किलो 170 ग्रॅम सोने पळविणाऱ्या या कारागिरांचा शोध घेण्यात येत आहे.