खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील विद्याविकास समिती हायस्कुलच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांच्याहस्ते सोमवारी (दि. ८) पार पडले.
मागील दीड वर्षांपासून चापोली, कपोली, मुडगई, वरकड, आमगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांची शाळेअभावी गैरसोय झाली होती. त्यातच मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळेच्या भिंती पडल्या होत्या. येथून जवळच असलेल्या आश्रमात या विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली होती. परंतु त्या ठिकाणाहूनही विद्यार्थ्यांना हलवावे लागले. विश्व भारत सेवा समितीच्या वतीने चालविण्यात येणाया या शाळेत आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग भारतात. २२८ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली होती. हि बाब शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच शाळेच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करण्यात आले. नुकसानग्रस्त निधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून तब्बल ३५ लाखांचा निधी शाळा इमारत उभारणीसाठी पुरविण्यात आला. याचप्रमाणे माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगाने २० लाखांचा निधी उभारण्यात आला. तसेच बेळगावमधील नामांकित उद्योजक आणि समाजसेवकांनीही शाळा इमारत उभारणीसाठी भरघोस देणगी दिली. या शाळेत खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. जंगल परिसर आणि दुर्गम भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा इमारतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
या शाळा इमारतीचे उद्घाटन मंत्री सुरेशकुमार यांच्याहस्ते सरस्वती पूजनाने पार पडले. कार्यक्रमात रा. स्व. संघाचे राष्ट्रीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलपती प्रा. करीसिद्धप्पा, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार अनिल बेनके, भाजप ग्रामीण जिल्हा घटक चे अध्यक्ष संजय पाटील, जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष अरविंदकुमार देशपांडे, विद्या विकास समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.