शहराच्या सौंदर्यीकरणात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत अनेक घोळ सुरू असून दुसऱ्या बाजूला दुभाजकावर लावण्यात आलेली झाडे माथेफिरुकडून तोडण्याचा प्रकार होत आहे. आरपीडी कॉर्नर ते गोवावेस दरम्यान असलेल्या दुभाजकावरील हा प्रकार असून ही सारी दृष्ये मोबाईलमध्ये कैद करण्यात आली आहेत.
या वृक्षांचे संगोपन आणि देखभाल करणे ही प्रामुख्याने वनखात्याची जबाबदारी आहे. त्यासोबतच पालिकेचीही आहे. आणि प्रत्येक नागरिकाचीही आहे. या मार्गावरील रस्ता सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून दुभाजकावर झाडे लावण्यात आली आहेत. सदर माथेफिरु दररोज ही झाडे तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
झाडांची नासधूस होण्यापासून थांबविण्यासाठी संबंधित खात्याने या माथेफिरूला वेळीच रोखण्याची गरज आहे. अन्यथा एकबाजूला स्मार्ट सिटीच्या कामाचा बोजवारा आणि दुसऱ्या बाजूला तेलंही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं, अशी गत होईल.
झाडे वाचवा देश वाचवा असा नारा देताना झाडे जगवा देश वाचवा -झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखा असे म्हणण्याची वेळ आली आहे.