सीमाभागातील समितीचा बालेकिल्ला असणाऱ्या येळ्ळूर ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचेच वर्चस्व अबाधित राहिले असून या ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी सतीश पाटील आणि उपाध्यक्षपदी लक्ष्मी मासेकर यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायत अध्यक्षपदी सतीश पाटील यांची निवड झाल्यानंतर ‘बेळगाव लाईव्ह’ ने बातचीत केली. यावेळी ग्रामपंचायतीत समितीचीच सत्ता कायम राहिली असून परंपरेनुसार सीमाप्रश्नाचा ठराव मांडणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
वर्षानुवर्षे चालत आलेली सीमाप्रश्नाच्या ठरावाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात येईल. सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच सभेत सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्यात येऊन तो सम्मतही करण्यात येईल. हि परंपरा कदापिही खंडित होऊ देणार नाही. येळ्ळूरवासियांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. याच धर्तीवर सीमाप्रश्नी १०० टक्के ठराव मांडणारच. आणि नेहमी समितीनिष्ठेनेच कार्यरत राहणार असल्याचे मत नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश पाटील यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना व्यक्त केले.
सत्ताकेंद्र असलेल्या येळ्ळूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जिल्हा पंचायत सदस्य आणि आमदार हे इतर राष्ट्रीय पक्षांशी जोडले गेले आहेत. त्याचबरोबर आता ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता आली आहे. अशावेळी कोणत्याही प्रकारचे राजकारण आड न येत केवळ आणि केवळ गावाच्या विकासासाठी कार्यरत राहून गावच्या विकासासाठीच कटिबद्ध असल्याचे सतीश पाटील यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय पक्षाच्या आमदारांसोबत हातमिळवणी करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये कुजबुज सुरु आहे परंतु मी कट्टर समितीनिष्ठ आहे. त्यामुळे शेवटपर्यंत समितीशीच एकनिष्ठ राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पहिल्याच बैठकीत येळ्ळूर ग्रामपंचायतीत सीमाप्रश्नी ठराव मांडण्यात येतो. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष उतरल्यामुळे हि लढत अत्यंत चुरशीची ठरली. परंतु सीमाभागातील बालेकिल्ला म्हणून परिचित असणाऱ्या येळ्ळूर ग्रामपंचायतीवर मराठी जनतेने पुन्हा एकदा अस्मिता सिद्ध करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आज पार पडलेल्या अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडीत दोन्ही पदे समितीकडे राखीव असल्याचे सिद्ध झाले. या निवड प्रक्रियेत सतीश पाटील यांनी १८ मते मिळवून भाजप समर्थक अरविंद संभाजी पाटील यांचा पराभव केला. अरविंद पाटील यांना १२ मते मिळाली असून उपाध्यक्षपदाच्या रिंगणात लक्ष्मी भरत मासेकर यांच्या विरोधात भाजप समर्थक राजकुमार तानाजी पावले हे उभे होते. परंतु या निवडप्रक्रियेत लक्ष्मी मासेकर यांनी २० मताधिक्यांनी उपाध्यक्षपदाची बाजी मारली.
एकंदर परिस्थिती पाहता सीमाभागात येळ्ळूर ग्रामपंचायतीमधील सीमाप्रश्नाच्या ठरावावरून सुरु असलेली कुजबुज आता लवकरच थांबणार असून पुन्हा एकदा ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात घेऊन जाण्याचा निर्धार येळ्ळूर ग्रामपंचायतीचे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर होणार आहे. या ग्रामपंचायतीची परंपरा सतीश पाटील यांच्यासह सर्व समितीनिष्ठ ग्रामपंचायत सदस्यांनी अखंडित ठेवण्याचा निर्धार केला आहे.