अनेकवेळा कित्येक व्यक्ती ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी आपल्या फावल्या वेळेत समाजकार्य करतात. परंतु आपला संपूर्ण वेळ ज्येष्ठांच्या सेवेसाठी देणारे खूप कमी. बेळगावमधील अशाच एका व्यक्तीसोबत ‘बेळगाव लाईव्ह’ ने संपर्क साधला. आदर्श नगर वडगाव येथे संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठांचे पुनर्वसन केंद्र चालविले जाते. आपल्या करियरचा एक भाग समजून ज्येष्ठांच्या सेवेत स्वतःला झोकून देणाऱ्या सविता कांबळे यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ ने केलेली बातचीत…
ऑक्टोबर २०२० मध्ये आदर्श नगर, वडगाव येथे सुरु करण्यात आलेल्या संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठांना आसरा देण्यात आला. सविता कांबळे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या या आश्रमात आज ३७ ज्येष्ठ नागरिक उत्तम प्रकारे रहात आहेत. त्यांच्या जेवणापासून त्यांच्या राहणीमानापर्यंत आणि त्यांच्या सर्व तब्येतीबद्दलच्या तक्रारींबाबत आपल्या संपूर्ण टीमनीशी सविता कांबळे कार्यरत आहेत.
मूळच्या हुबळी आणि विवाहानंतर बेळगाव येथे वास्तव्यास आलेल्या सविता कांबळे यांनी कल्पवृक्ष फाउंडेशनमध्ये यापूर्वी संस्थापक सदस्य आणि सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे. समाजशास्त्र आणि मानसशास्त्राचा अभ्यास करून सविता कांबळे यांनी अनेक वृद्धांना आपुलकीचा हात दिला आहे. काहीवेळा कुटुंबियांना सर्वतोपरी अनेक आजारी वृद्धांची देखभाल करणे जमत नाहीत. अशावेळी संजीवनी फाउंडेशनसारख्या अनेक संस्था मदतीचा हात पुढे करतात. या आश्रमात एकाच वयोगटातील सर्व सदस्य असल्यामुळे उतारवयातील जीवनात प्रत्येकाला आधार मिळतो. विचारसरणी जुळते. आपल्या आश्रमात एकूण १८ जण कर्मचारी आहेत. त्यांच्या माध्यमातून या सर्व सदस्यांची संपूर्ण काळजी घेतली जाते.
जबाबदारी पेलत सुरु असणारे हे कार्य आपल्याला मानसिक समाधान देते, अशी प्रतिक्रिया सविता कांबळे यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना व्यक्त केली. आपल्या फाउंडेशनमध्ये येणाऱ्या वृद्धांची केवळ देखभाल इतकीच न करता त्यांना कुटुंबाप्रमाणेच वागविण्यात येते. शिवाय आपल्याकडे येणारा प्रत्येकजण हा आपले कुटुंबच आहे. अनेक वृद्ध आपल्या कुटुंबासमवेत जितके मिळूनमिसळून रहात नाहीत, ते या फाउंडेशनमध्ये येऊन आपले उतारवयातील जीवन आनंदाने जगताना आपण पाहिले असल्याचेही संजीवनी कांबळे यांनी सांगितले.
खर्च आणि आणि उपचार याहीपेक्षा पुढे जाऊन ‘संजीवनी’मध्ये वृद्धांवर मायेची पाखरण केली जाते आणि त्यामुळे इथे येणारे सगळेच ‘संजीवनी ‘ कुटुंबातला भाग होऊन जातात. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणानंतर नोकरी आणि आर्थिक स्थैर्य यामध्ये प्रत्येकजण अडकतो. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी वृध्दांचा आधारवड होणाऱ्या सविता कांबळे यांचा समाजापुढे एक आदर्श निर्माण होत आहे. सविता कांबळे यांच्या कार्यासाठी ‘बेळगाव लाईव्ह’तर्फे अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!