खडेबाजार पोलिसांनी शुक्रवारी शहरातील शेरी गल्ली येथे छापा टाकून 29.5 क्विंटल रेशन तांदळाचा बेकायदेशीर साठा जप्त केला असून या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. सदर तांदूळ साठा सावंतवाडीला नेण्यात येणार होता असे समजते.
महादेव लक्ष्मण पाटील (रा. धामणे), सुहास सुरेश पिळवकर (रा. वडगाव) आणि अहमद बशीर अहमद (रा. वीरभद्रनगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यात रेशन तांदळाचा काळाबाजार सुरूच आहे.
या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी शेरी गल्ली परिसरात एका कंटेनरमधून 118 तांदळाच्या पिशव्या खडेबाजार पोलिसांनी जप्त केल्या. सदर 29.5 क्विंटल रेशन तांदळाची बाजारातील किंमत 66,375 रुपये इतकी होते. पंचनामा करून वाहनासह तांदूळ साठा ताब्यात घेण्यात आला आहे.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. जप्त केलेला तांदूळ साठा सावंतवाडीला पाठवण्यासाठी वाहनात भरण्यात आला होता अशी माहिती उघडकीस आले आहे.
दरम्यान, हा साठा कोठून आला? रेशनचे तांदूळ सावंतवाडीला पाठविण्याची योजना कोणाची होती? याचा तपास करण्यात येत आहे. या कारवाईमुळे तांदळाचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.