राणी चन्नम्मा विद्यापीठासाठी वनखात्याच्या मालकीची 177 एकर जमीन कर्नाटकला देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे.
भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाला 177 एकर जागेची गरज असल्याने राज्य सरकारने केंद्राकडे वनखात्याच्या मालकीची 177 एकर जागेची मागणी केली होती. केंद्र सरकारच्या वनखात्याच्या सल्लागार समितीने कर्नाटकचा हा प्रस्ताव नाकारला आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठाला त्यामुळे आता नव्या जागेचा शोध करावा लागणार आहे. भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाची सध्या असलेली जागा वनखात्याच्या मालकीची आहे. ही जागा पुनश्च आपल्याकडे हस्तांतरित करावी असा लकडा वनखात्याने लावला आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या अटीनुसार नव्या विद्यापीठाला सुमारे 120 एकर जमिनीची गरज आहे. मात्र बेळगाव परिसरात जागेची कमतरता भासत असल्याने राणी चन्नम्मा विद्यापीठ हिरेबागेवाडी येथे स्थलांतरित करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
बेळगाव परिसरातील जवळपास सर्व मोक्याच्या जागा खाजगी शैक्षणिक संस्थांनी आधीच खरेदी केलेल्या आहेत. मच्छेनजीक मोठ्या जागेवर ताबा मिळवणाऱ्या विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापिठाप्रमाणे (व्हीटीयू) अन्य शैक्षणिक संस्थांनी विविध ठिकाणच्या जागा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. परिणामी बेळगाव परिसरात मोठ्या जागाच शिल्लक राहिलेल्या नाहीत. यासाठीच राणी चन्नम्मा विद्यापीठासाठी आवश्यक असणाऱ्या 177 एकर जागेसाठी सरकारने केंद्राकडे वनखात्याच्या मालकीच्या जागेची मागणी केली होती. मात्र आता केंद्राने या मागणीला नकार दिला आहे.