गरिबांचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावचा चेहरा आता हळूहळू बदलत चालला आहे. अर्थात बेळगाव विकासाच्या दिशेने पुढे जाण्याऐवजी समस्यांच्या विळख्यात अधिकाधिक गुरफटत चालले आहे. अशातच तालुक्यातील परिसराचा तर विषयच न काढलेला बरा! येथील रस्त्यांची अशापद्धतीने धूळधाण उडाली असून अनेक ग्रामीण परिसरात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
रामघाट रोड वरून जाणारा बेनकनहळ्ळी ते राकसकोप पर्यंतचा रास्ता धुळीच्या धुक्यात हरवून गेला आहे. सध्या थंडीचा मौसम सुरु असून नागरिकांना दात धुक्याऐवजी धुळीच्या धुक्याचा सामना करावा लागत आहे. कित्येक महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. परंतु निधी मंजूर होऊनही अद्याप येथील रस्तेकामांना सुरुवात झाली नाही. वाहनधारक तर नेहमीचीच कसरत करत आहेत. आता पादचाऱ्यांनाही आता याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व असुविधेकडे साफ डोळेझाक केल्याचे निदर्शनास येत आहे.
या रस्त्यावरून मार्गस्थ होणे म्हणजे स्वतःहून एखादी आपत्ती ओढवून घेण्यासारखे आहे. पावसाळ्यात खड्डे आणि खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो आणि उन्हाळी आणि हिवाळी ऋतुमानात धुळीचा सामना! हि समस्या गेल्या पाच वर्षांपासून जैसे थे असून दुरुस्तीच्या नावाखाली तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. परंतु ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशा प्रवृत्तीमुळे हा रस्ता अद्यापही नादुरुस्त आहे.
येथील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. निवेदने दिली. परंतु आंदोलनापुरते आश्वासन देऊन जेसीबी आणून रस्त्याच्या दुरुस्तीचा आभास निर्माण करण्यात आला. आणि पुन्हा कामाला स्थगिती मिळाली. या रस्त्यावरून जाताना कित्येकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. याच रस्त्यावरून बेळगुंदी माईन्स अंतर्गत बॉक्साइट वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचीही वर्दळ असते.
बेनकनहळ्ळी सहित जानेवाडी ते बीजगर्णी, बेळवट्टी ते कर्ले या रस्त्यांचीही वाईट परिस्थिती झाली आहे. या सर्व परिस्थितीवर सातत्याने आंदोलने आणि निवेदने देऊन नागरिक थकले आहेत. आणि कंटाळले आहेत. या रस्त्यावर कोणतीही मोठी दुर्घटना होण्याआधी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे.