टिळकवाडी येथील पहिल्या-दुसऱ्या आणि तिसऱ्या रेल्वे गेटसह उद्यमबाग चौथ्या रेल्वे गेट लेव्हल क्रॉसिंगच्या ठिकाणी नवे रूळ घालण्याबरोबरच सखोल तपासणीचे जे काम हाती घेण्यात आले आहे ते येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, असे नैऋत्य रेल्वेच्या डीआरएम हुबळी यांनी कळविले आहे.
आपल्या ट्विटद्वारे डीआरएम हुबळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅसेंजर रेल्वे गाड्या प्रति तास 110 कि.मी. वेगाने सुरक्षित धावण्यासाठी दहा वर्षांतून एकदा फ्रिक्वेन्सी (पुनरावृत्तीचा वेग) तपासण्यासाठी खास मशीनद्वारे लेव्हल क्रॉसिंग गेटच्या ठिकाणी सखोल तपासणी केली जाते.
या तपासणीसह नवे रूळ घालण्याचे काम पहिल्या ते चौथ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत उद्यमबाग येथील चौथ्या रेल्वे गेटच्या (लेव्हल क्रॉसिंग क्र. 380) ठिकाणचे काम पूर्ण झाले असून हे गेट वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे.
तथापि तिसरे रेल्वे गेट (ले. क्रॉ. क्र. 381), दुसरे रेल्वे गेट (ले. क्रॉ. क्र. 382) आणि पहिले रेल्वे गेट (ले. क्रॉ. क्र. 383) येथील काम अद्याप सुरू आहे. सदर काम येत्या अनुक्रमे दि. 23, 20 आणि 25 फेब्रुवारी रोजी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तेव्हा नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. तसेच दुरुस्तीच्या कामामुळे सर्वांना जो त्रास सहन करावा लागत आहे त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे डीआरएम हुबळी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.