शिवमोगा आणि चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील हिरेनगवेली गावातील वनविभागात झालेल्या स्फोटाबद्दल शोकांतिका व्यक्त करून आपल्या जिल्ह्यात अशा घटना होण्यापासून रोखले पाहिजे, यासाठी अवैध उत्खनन आणि स्फोटकांचा अवैध तस्करींवर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी लक्ष्मण निंबरगी यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी कार्यालयात बुधवारी बोलाविण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत ते बोलत होते. आपला मूळ उद्देश हा अवैध उत्खनन आणि स्फोटक वाहतुकीसंबंधी शोध घेऊन, असे प्रकार रोखणे आणि आळा घालणे हा आहे. मानवी जीवनाला ज्या स्फोटक वस्तूंपासून धोका आहे, अशा स्फोटकांची तस्करी थांबविण्यासाठी कडक निगराणी ठेवण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली आहे, अशी माहिती निंबरगी यांनी दिली.
राज्यात अवैध उत्खनन आणि स्फोटक वाहतुकीला ऊत आळा आहे. यापुढील काळात अशा गोष्टींवर आळा घालण्यासाठी सावधगिरीचे उपाय राबविणे गरजेचे आहे. यासंदर्भातील सर्व गोष्टीसाठी प्रत्येक महिन्यात तालुकास्तरीय बैठक घेऊन निर्धारित कालावधीत अहवाल सादर करण्याची सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आली. अरण्य परिसरात कोणत्याही पद्धतीने बेकायदेशीर उत्खनन करण्यात येत असल्यास कडक कारवाई करण्याची सूचनाही देण्यात आली.
वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी जीपीएस अत्यावश्यक असून जीपीएस नसणाऱ्या वाहनांना प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच पास नसणाऱ्या वाहनातून वाळू वाहतूक करण्यात येत असेल तर अशी वाहने ताब्यात घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.
प्रामुख्याने गोकाक आणि सतीगेरी या गावात बेकायदेशीर उत्खनन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही तालुक्यात लवकरात लवकर सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी उत्खनन करण्यात येत असलेल्या ठिकाणी संयुक्तपणे भेट देऊन पाहणी करण्याचे निर्देश निंबरगी यांनी दिले.
या बैठकीत खाण आणि भूविज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्फोटकांविषयी, त्यामधील रसायनांविषयी, त्याच्या वाहतुकीविषयी, परवानगी आणि अटींविषयी माहिती दिली. कोणत्या प्रकारे उत्खननावेळी स्फोट करावा, आणि सध्या पेट्रोल – रॉकेलच्या माध्यमातून कशापद्धतीने स्फोट घडवून आणून अनुचित प्रकार घडत आहेत, याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
या बैठकीला अतिरिक्त पोलीस वरिष्ठाधिकारी अमरनाथ रेड्डी, खाण आणि भू विभागाचे अधिकारी, अरण्य उपसंरक्षणाधिकारी, अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा अधीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पंचायत राज विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पोलीस अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व सीपीआय उपस्थित होते.