बेळगाव शहरात भाड्याने सायकली देण्याची सेवा हाताळण्यासाठी खाजगी चालक (ऑपरेटर) नियुक्त केले जाणार असून त्यासाठी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने निविदा काढल्या आहेत. रचना, बांधणी, देखभाल आणि हस्तांतरण या आधारावर ही सायकल सेवा सुरू केली जाणार आहे.
म्हैसूर येथे यापूर्वीच भाड्याने सायकली देण्याची सेवा (पब्लिक बाईक शेअरिंग) “ट्रिन ट्रिन” या नांवाने सुरू झाली आहे. बेळगाव शहरात भाड्याने सायकली देण्याच्या प्रकल्पाची निविदा येत्या मार्च 2021 मध्ये खुली केली जाणार आहे. सदर सेवेच्या विकासासाठी सेवा सुरू झाल्यापासून प्रायोगिक तत्त्वावर 6 महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे.
पुढे व्यवसायिक प्रारंभाच्या दिवसापासून 36 महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. भाड्याने सायकली देण्याच्या या उपक्रमासाठी चोरीला जाणार नाहीत अशा पद्धतीच्या कुलुप असलेल्या 100 सायकली, इलेक्ट्रिक सायकली 100 आणि 100 ई -बाइक्स आवश्यक असणार आहेत.
शहरात विविध ठिकाणी या सायकलींसाठी पार्किंग हब /लॉट उपलब्ध केले जातील. ग्राहक सायकल परत करण्यापूर्वी प्रत्येक वेळी सायकल केंव्हा घेऊन गेला यावर भाडे आकारणी केली जाईल. ही भाडे आकारणी सायकल निहाय पुढील प्रमाणे असेल.
0 ते 30 मिनिटे कालावधी : कुलूप असलेली सायकल 5 रुपये, इलेक्ट्रिक सायकल 15 रु., ई-बाईक 20 रुपये. 30 मिनिटे ते 2 तास कालावधी : कुलूप असलेली सायकल 10 रु., इलेक्ट्रिक सायकल 40 रु., ई-बाईक 50 रुपये. 2 ते 4 तास कालावधी : कुलूप असलेली सायकल 20 रु., इलेक्ट्रिक सायकल 100 रु., ई-बाईक 120 रुपये.