खाजगी शैक्षणिक संस्थांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये अनेक सुविधांची कमतरता असते, अशा परिस्थितीत एक सरकारी अधिकारी अतिरिक्त कष्ट घेत जाहिरातबाजी आणि प्रसिद्धीपासून दूर राहून समाजातील आर्थिक दुर्बल स्तरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटत आहे. बेळगाव उपविभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक तेली असे या अधिकाऱ्याचे नांव आहे.
हुक्केरी, बेळगाव आणि खानापूर तालुक्यांमध्ये असलेल्या सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचवावा यासाठी तेली यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या कामी त्यांना तहसीलदार, महसूल निरीक्षक, व्हिलेज अकाउंटंट आणि पंचायत विकास अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे.
खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश मुलांना नाईलाजाने शाळेला न जाता वीटभट्ट्यांवर काम करावे लागत असल्याचे पाहून या अधिकाराचे मन हेलावले. त्यानंतर त्यांनी वीट भट्ट्यांच्या ठिकाणी आकस्मिक भेट देऊन संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात वीटभट्ट्यांवर बालमजुरांना कामाला जुंपल्याचा गुन्हा नोंदविला. यावर न थांबता पुढचे पाऊल उचलताना अशोक तेली यानी संबंधित मुलांना शाळेत जाण्यासाठी मदत करून त्यांच्या कुटुंबांना मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या.
याव्यतिरिक्त खानापूर तालुक्यातील गुंजी व अन्य खेडे गावातील कुटुंबांना बीपीएल कार्ड उपलब्ध करून देण्याबरोबरच तेथील वयोवृद्धांसाठी वृद्धापवेतन सुरू करून दिले. दुसऱ्या बाजूला त्यांनी मागासवर्गीय कल्याण खात्यातर्फे चालविण्यात येत असलेल्या चार शाळांसह पाच निवासी शाळांना आणि हुक्केरी तालुक्यातील समाजकल्याण खात्याच्या 11 शाळांना भेटी दिल्या. या शाळांमधील वाचनालयांसाठी त्यांनी 4000 हून अधिक पुस्तके देणगीदाखल दिली.
खानापूर येथील एका शाळेची गरज लक्षात घेऊन त्यांनी या शाळेला संगणक, पुस्तके आणि शिक्षणाचे साहित्य मंजूर केले. गरिबांची मुले दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहू नयेत हेच माझे ध्येय आहे. पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य देऊन यासाठी मी थोडाफार हातभार लावत आहे. या कामी मला माझ्या सहकारी अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे, असे सहाय्यक आयुक्त अशोक तेली आपल्या कार्याविषयी बोलताना सांगतात.