माळमारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय सुनील पाटील यांनी ऍडव्होकेट चेतन इराण्णावर यांच्याशी उद्धट वर्तन करून अर्वाच्च शब्दात संभाषण केल्याविरोधात अचानकपणे वकिलांनी न्यायालयासमोर आंदोलन छेडले. रास्तारोको करून तब्बल तीन तास वाहतूक थांबविली. या साऱ्या प्रकरणाचा शेवट जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आणि सीपीआय सुनील पाटील यांच्या माफीनाम्याने झाला. आणि अखेर वकिलांनी आंदोलन मागे घेतले.
चेतन इराण्णावर आणि इतर वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठे आंदोलन छेडले. न्यायालय आवारातील रस्ता वाहतूक अडवून धरणे आंदोलनदेखील छेडण्यात आले. संबंधित सीपीआय विरोधात कारवाई करावी, त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी वकिलांच्या वतीने करण्यात येत होती.
याठिकाणी तातडीने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस उपयुक्त विक्रम आमटे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या वकिलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्याठिकाणी तात्काळ माळमारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय सुनील पाटील यांनाही बोलाविण्यात आले. परंतु अद्याप वकिलांनी रास्ता रोको मागे घेतला नव्हता.
पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली त्या नंतर तब्बल तीन तासांनी वकिलांनी आंदोलन मागे घेतले.
यानंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासमोर माळमारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय सुनील पाटील यांनी घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात असा प्रकार आपल्याकडून होणार नसल्याची गवाही दिली. वकिलांची माफी मागून झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करण्यात आला. यानंतर वकिलांनी आपले आंदोलन मागे घेतले. आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.