संवर्धनाच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्यामुळे जुन्या भक्कम व आकर्षक बांधकामाचा ऐतिहासिक वारसा अभिमानाने मिरवणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील अनेक वास्तु / इमारती आपले महत्त्व गमावू लागल्या आहेत. बेळगाव जिल्हा पंचायतीची जुनी इमारत त्यापैकीच एक असून ही दिमाखदार इमारत सध्या संवर्धनाच्या प्रतीक्षेत असलेली पहावयास मिळते.
सदर दुमजली इमारत 100 वर्षापेक्षा अधिक जुनी असून या ठिकाणी भू -नोंदणी उपसंचालकांचे कार्यालय (डीडीएलआर), बेळगाव सिटी सर्व्हे कार्यालय, कर्नाटक लोकसेवा आयोग कार्यालय आणि नवलगुंद -शिरसंगी ट्रस्टचे कार्यालय आहे. याखेरीज अलीकडेच राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी देखील आपले कार्यालय या ठिकाणी सुरु केले आहे.
या इमारतीचा उर्वरित भागाला अडगळीचे स्वरूप प्राप्त झाले असून या ठिकाणी वापरात नसलेल्या फर्निचरचा साठा गेली अनेक वर्षे धूळ खात पडून आहे. इमारतीच्या दर्शनीय भागावर असणारे घड्याळ बंद अवस्थेत असून वर्षानुवर्षे ऊन पावसाचा मारा सहन करून या इमारतीचा रंग उडाला आहे.
मात्र दुर्दैवाने आजतागायत एकाही अधिकाऱ्याने अथवा संबंधित खात्याने याची दखल घेऊन सदर दिमाखदार जुन्या इमारतीचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही.
उपरोधाची बाब ही म्हणजे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी आपल्या कार्यालयाची अंतर्गत सजावट काळजीपूर्वक केलेली आहे. परंतु जुना वारसा जपणाऱ्या या इमारतीच्या बाह्यांगाकडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. सुप्रसिद्ध इतिहासकार प्रा. स्मिता सूरेबानकर म्हणाल्या की, बेळगावमध्ये अशा अनेक औपनिवेशिक इमारती अथवा वास्तू आहेत, ज्या 18 व्या शतकातील आणि 19 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय आणि प्रादेशिक आयुक्तांचे कार्यालय तसेच जिल्हा न्यायालय या इमारती त्याच काळात बांधल्या गेल्या आहेत. त्याकाळी ब्रिटिश विविध कारणांसाठी या इमारतींचा वापर करत होते. वंश परंपरा जपण्यासाठी खरतर या इमारतींचे नूतनीकरण आणि संवर्धन झाले पाहिजे. यापूर्वी तत्कालीन प्रादेशिक आयुक्त चिरंजीवी सिंग यांनी आपल्या कार्यालय इमारतीचे तिच्या मूळ स्वरूपाला कोणतीही बाधा न पोहोचवता नूतनीकरण करून घेतले होते. मात्र शहराचे सौंदर्य टिकविण्यासाठी अन्य जुन्या इमारती आणि वास्तूंच्या बाबतीत अद्यापपर्यंत असे प्रयत्न केले गेले नाहीत, असे प्रा. सूरेबानकर यांनी खेदाने सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना मी माझे कार्यालय या ठिकाणी सुरू केल्यानंतर संपूर्ण इमारतीची साफसफाई करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि या जुन्या ऐतिहासिक इमारतीचे संपूर्ण नूतनीकरण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी माझ्या परीने मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी स्पष्ट केले.