सौंदलगा नजीक असणाऱ्या कळंत्रे मळ्यानजीक महामार्गाशेजारी असणाऱ्या झाडाला कार आदळून झालेल्या भीषण अपघातात मायलेकींचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी बेळगावमार्गे येणाऱ्या कारने (वाहन क्रमांक KA03ND5161 ) कुर्ली फाट्यानजीक असलेल्या एका झाडाला धडक दिली.
कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर अपघात घडला असून या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्ती या सांगली येथील असून लता राजेंद्र पाटील (वय 40) व अनिषा राजेंद्र पाटील (वय 17) अशी त्यांची नावे आहेत.
यासह इतर तीन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. जखमींवर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अथर्व राजेंद्र पाटील (वय 14), सुमीत राजेंद्र पाटील (19), राजेंद्र शिवाजी पाटील (44, सर्व रा. बिस्तूर. जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत.
सांगलीहून बेळगावमार्गे बंगळूरला निघाले असताना राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा येथील आल्यावर कारची महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या झाडाला धडक बसली. आणि या धडकेत मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.