लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील हुक्केरी तालुक्यातील मोहनगा दड्डी येथील भावेश्वरी देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.
बेळगाव सह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखण्यात येणाऱ्या या देवस्थानची यात्रेसंदर्भातील बैठक बुधवारी (10 फेब्रुवारी) मोदगे गावातील श्री भावेश्वरी मंदिरात ट्रस्ट कमिटीच्या कार्यालयात आयोजिण्यात आली होती. या बैठकीत यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
या बैठकीला हुक्केरीचे तहसीलदार, सीपीआय व पीएसआय, तालुका पंचायत सदस्या आणि ग्रामपंचायत सदस्य व ट्रस्ट कमिटीचे चेअरमन उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये यात्रेबद्दल चर्चा करून सरकारी नियमानुसार व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला गावातील सर्व नागरिकांनी व बेळगावकरांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
पंचमंडळी, मानकरी व कमिटीच्या उपस्थितीत भावेश्वरी देवीची यात्रा सोमवार 1 मार्च आणि मंगळवार 2 मार्च रोजी होणार आहे. प्रति वर्षाप्रमाणे माघ पौर्णिमेनंतर या देवीचा वार्षिक यात्रोत्सव आयोजित केला जातो.
महाराष्ट्र आणि बेळगावातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला जात असतात. नवसाला पावणारी देवी म्हणून भावेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.