रंगतदार अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी अलोन स्पोर्ट्स मुंबई संघाला 2 गड्यांनी पराभूत करून बलवान मोहन मोरे संघाने साईराज चषक निमंत्रितांच्या 7 व्या भव्य आंतर राज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासह 1 लाख 21 हजार 111 रुपयांचे बक्षीस पटकावले.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर रविवारी सदर भव्य बक्षीस रकमेची क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. अलोन स्पोर्ट्स मुंबई आणि मोहन मोरे इलेव्हन या संघांमध्ये आकर्षक साईराज चषकासाठी अंतिम सामना खेळविला गेला. अंतिम सामन्याची नाणेफेक टिळकवाडी पोलीस स्थानकाचे पीएसआय विनायक बडिगेर यांच्या हस्ते झाली. नाणेफेक जिंकून मोहन मोरे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अलोन स्पोर्ट्स मुंबई संघाने पहिल्या डावात 12 षटकात 5 गडी बाद 121 धावा काढल्या.
मोरे संघातर्फे अक्षय गरत (22/2) प्रीतम बारी, अनिकेत राऊत व प्रज्योत हंबीरे (प्रत्येकी 1) यांनी यशस्वी गोलंदाजी केली प्रत्युत्तरादाखल मोहन मोरे संघाने 12 षटकांत 7 बाद 149 धावा काढून पहिल्या डावात 28 धावांची आघाडी मिळवली. त्यांच्या अभिषेक अंगाने (48), अनिकेत राऊत (34), आणि श्रेयस कदम (29) प्रीतम बारी (23) यांनी शैलीदार फलंदाजी केली.
मोहन मोरे संघाची पहिल्या डावातील आघाडी कमी करत अलोन स्पोर्ट्स मुंबई संघाला आपल्या दुसऱ्या डावात 12 षटकात 9 बाद 110 धावा जमविता आल्या. मोहन मोरे संघातर्फे प्रीतम बारी याने भेदक गोलंदाजी करताना अवघ्या 10 धावा देऊन तब्बल 5 गडी बाद केले. त्याला प्रज्योत अंबीरे, अक्षय (प्रत्येकी 2) आणि सुहास पोवार (1) यांनी सुंदर साथ दिली. परिणामी विजयासाठी 83 धावा काढण्याचे आव्हान मोहन मोरे संघाने 10.3 षटकात 8 बाद 87 धावा काढून यशस्वीरित्या पेलले. त्यांच्या अभिषेक अंगारे (23), अनंत वाघ आणि जयेश (प्रत्येकी 14) यांनी काळजीपूर्वक गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला.
अंतिम सामन्यानंतर आयोजीत बक्षिस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे पीएसआय विनायक बडिगेर, मल्लिकार्जुन जगजंपी, अक्षय जगजंपी, राजेश जाधव, जॅकी मस्करनेस, नारायण पगारे, शीतल वेसणे, मोहन मोरे, अमित पाटील, महेश फगरे, विजय जाधव, रोहित देसाई, गजानन पगारे, शरद पाटील, महेश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मोहन मोरे संघाला 1,21,111 रु. तर उपविजेत्या अलोन स्पोर्ट्स मुंबई संघाला 66,000 रुपयांसह आकर्षक करंडक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी सामनावीर अभिषेक अंगाने (मोहन मोरे), उत्कृष्ट फलंदाज कृष्णा सातपुते (अलोन मुंबई), उत्कृष्ट गोलंदाज प्रज्योत हंबीरे (मोहन मोरे), उत्कृष्ट यष्टीरक्षक अनंत वाघ, उत्कृष्ट संघ श्री गणेश इलेव्हन हिंडलगा, इम्पॅक्ट खेळाडू सादिक तिगडी (एचसीव्ही), स्पर्धेतील उत्कृष्ट झेल अजीम टेलर (उ.प्र.) यांना चषक व रोख 5000 रुपयांचे वैयक्तिक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
मालिकावीर मोहन मोरे संघाच्या प्रितम बारी याला जगजंपी बजाजकडून पुरस्कृत केलेली मोटर सायकल मल्लिकार्जुन जगजंपी यांच्या हस्ते बक्षिसादाखल देण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साईराज स्पोर्ट्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अंतिम सामन्याचा आनंद लुटण्यासाठी व्हॅक्सिन डेपो मैदानावर क्रिकेटप्रेमिंची एकच गर्दी झाली होती.