घरची परिस्थिती बेताची, आई शेतात मोलमजुरी करते तर वडील ट्रक ड्रायव्हर! अशात आपल्या शिक्षणातील आपली मेहनत कुठेही कमी पडू न देता बेळगावच्या तरुणाने परदेशात उत्तुंग भरारी घेतली आहे. गाडेमार्ग शहापूर येथे राहणाऱ्या सौरभ माळवी या तरुणाने आपल्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर जगातील नामांकित अशा ‘मर्सिडीज बेन्झ’ या कंपनीमध्ये स्थान मिळविले आहे.
प्राथमिक शिक्षण आदर्श मराठी विद्यामंदिर आणि डीवायसी भरतेश हायस्कुल मधून माध्यमिक शिक्षण पूर्ण करत प्रथम क्रमांकाने पास होऊन मराठा मंडळ पॉलिटेक्निक महाविद्यालयात मेकॅनिकल डिप्लोमा विभागात सरकारी जागा मिळवत आपले महावियालयीन शिक्षणदेखील अप्रतिमरीत्या पूर्ण केले. सीईटी परीक्षेत संपूर्ण कर्नाटकात १७२ वा रँक प्राप्त झाल्यानंतर जीआयटी महाविद्यालयात बीई मेकॅनिकल शिक्षण पूर्ण केले. सौरभ माळवी याने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी मध्ये पूर्ण केले आहे हे विशेष. यावेळी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना त्याने सांगितले कि, इंग्रजी येणे अत्यावश्यक आहे. परंतु मराठीमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकांमध्ये इंग्रजीचा न्यूनगंड येतो. आपल्या प्रयत्नाने, चिकाटीने आणि मेहनतीने कोणताही कठीण टप्पा यशस्वी पार करू शकतो, असे त्याने सांगितले.
तो पुढे म्हणाला, उच्चशिक्षणासाठी मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आर्थिक चणचणीमुळे शैक्षणिक फी भरणे शक्य नव्हते. परंतु माझे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी माझा मोठा भाऊ गणेश साळवी याने मला मदत केली. आपले शिक्षण थांबवून माझ्या शिक्षणासाठी त्याने पुढाकार दिला. उद्यमबाग येथील खासगी कारखान्यात नोकरीला जाऊन घरखर्चासाठी त्याने हातभार लावला. माझ्या आई वडिलांनीही मला खूप मोठा पाठिंबा दिला. त्यामुळे मी हे यश मिळवू शकलो, असे त्याने सांगितले.
सौरभ माळवी या तरुणाची जर्मनी येथील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक येथे निवड करण्यात आली आहे. जगातील २०० विद्यार्थ्यांच्या यादीत सौरभचेही नाव आहे. सध्या बंगळूर येथे मर्सिडीज बेंझ च्या कार्यालयात गेली अडीज वर्षे तो रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात कार्यरत आहे. या कामाची दखल घेत सौरभला एप्रिल २०२० मध्ये टॉप काँट्रीब्युटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जर्मनी येथील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक या विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर कोणत्याही कंपनीच्या सीईओ, वरिष्ठ पदावर काम करता येते. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी यासारख्या कंपन्या विद्यापीठात सहयोगी म्हणून काम करतात. त्यामुळे जगातील नामांकित कंपन्यांसोबत सौरभला काम करण्याची संधी जर्मनी येथे मिळाली आहे.
गाडेमार्ग, शहापूर येथे वास्तव्यास असणाऱ्या या तरुणाचे स्वप्न यापेक्षाही उंच भरारी घेण्याचे आहे. १० बाय १० च्या खोलीपासून सुरु केलेला हा प्रवास आता जगभर लक्षवेधी ठरणार आहे. मर्सिडीज बेन्झ कंपनीत कार्यरत असताना आई वडील आणि भावाला हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढून स्वतःची अशी एक स्वतंत्र कंपनी सुरु करण्याचे त्याचे स्वप्न आहे. यासाठी त्याने प्रयत्नदेखील सुरु केले आहेत, असे त्याने सांगितले. जगभरातील तंत्रज्ञानाचा अभ्यास करता आल्यामुळे स्वतःची एक कंपनी सुरु करून तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा त्याचा मानस आहे.
तंत्रज्ञानात दररोज अनेक बदल होत आहेत. सध्या मोबाईल वर सर्व गोष्टी वेगाने पसरत चालल्या आहेत. मोबाईलच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती उपलब्ध होत आहे. शिक्षण घेऊनही नोकरी करता न येणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीकडे वळायला हवे. सध्या अनेक कंपन्या विद्यार्थ्यांच्या कल्पक तंत्रज्ञानाच्या खरेदीकडे वाळू लागल्या आहेत. त्यामुळे आपले कौशल्य, निर्मितीकला, कल्पना वापरून तरुणांनी प्रगती करावी, असा सल्ला सौरभ माळवी याने दिला आहे.