जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त शहरातील लोकमान्य सामाजिक आणि शैक्षणिक केंद्रातर्फे केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला आज सकाळी रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ झाला.
कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित या शिबिराच्या उद्घाटन समारंभ आज सकाळी उत्साहात पार पडला. प्रारंभी माजी नगरसेवक आणि लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी जागतिक मराठी भाषा दिनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते असे सांगून पंढरी परब यांनी कोरोनामुळे प्रत्येकाला आरोग्याचे महत्व आणि आपत्कालीन परिस्थिती पर्यायाने रक्तदानाचे महत्व याची जाणीव झाली आहे. रक्तदाता हा डॉक्टर आणि रुग्णांमधील महत्त्वाचा दुवा असतो. तेंव्हा प्रत्येकाने आपल्या परीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदान केले पाहिजे, असे परब यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे लोकमान्य को. ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते श्री धन्वंतरी पूजन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लोकमान्यचे जेष्ठ संचालक शेवंतीलाल शाह, डॉ. सोनल धामणकर, डॉ. अभिलाषा आदी उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात किरण ठाकूर यांनी सामाजिक स्वास्थ्यासाठी 1984 साली सुरू केलेली रुग्णवाहिका, त्यानंतर सुरु केलेली शववाहिका, पुढे लोकमान्यच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर आदी विविध स्वास्थ्य संबंधी सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. लोकमान्य सोसायटीमधील कर्मचाऱ्यांमध्ये देखील रक्तदानाबाबत जागृती करण्यात आली असून आज या सोसायटीतील महिला कर्मचारी देखील रक्तदानात आघाडीवर आहेत हे विशेष होय, असे त्यांनी सांगितले. तसेच शिबिराला शुभेच्छा दिल्या.
अनिल चौधरी यांनी सदर रक्तदान शिबिराचा उद्देश स्पष्ट करून रक्तदान संदर्भातील गैरसमज दूर केले. रक्तदानामुळे शरीरात व्याधी निर्माण होत नाही. समतोल राहतो आणि शरीरढ सुदृढ राहते असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी लोकमान्यचे संचालक गजानन धामणेकर, अजित गरगट्टी, सुबोध गावडे, विनायक जाधव, राजीव नाईक, डॉ. विरगी, डॉ. कृष्णा माने आदींसह लोकमान्य सोसायटीचे अन्य संचालक, लोकमान्य सामाजिक आणि शैक्षणिक केंद्राचे पदाधिकारी -सदस्य, केएलई हॉस्पिटलचे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित डॉक्टरांचा किरण ठाकुर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. इतरांना प्रेरणा देताना या शिबिरात स्वतः संचालक पंढरी परब सुबोध गावडे आदींनी रक्तदान केले
गेल्यावर्षी आयोजित या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून प्रत्येकी 300 एमएल 100 पिशव्या रक्त संग्रहित करण्यात आले होते. केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित आजचे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.