कुलूपबंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 12 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना भर दिवसा शुक्रवारी दुपारी श्रीनगर येथे उघडकीस आली. या धाडसी चोरीमुळे श्रीनगर परिसरात खळबळ उडवून भितीचे वातावरण पसरले आहे.
अन्वर साहब अब्बास कोणी भावी यांच्या श्रीनगर येथील घरामध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे श्रीनगर येथील सेक्टर क्रमांक सहा मध्ये अन्वर साहेब यांचे घर आहे त्या परिसरात त्यांचे फर्निचरचे दुकान आहे शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी 9:30 वाजता अन्वर साहेब घरातून आपल्या दुकानाला गेले. त्यानंतर 12:15 वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी शाहीन व मुलगी या दोघी देखील घराला कुलूप लावून दुकानाकडे गेल्या. त्यानंतर दुपारी 4:15 वाजता ते सर्वजण घरी परतले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांच्या घरातील वस्तू विस्कटलेल्या होत्या आणि कपाटातील सुमारे 25 तोळे सोन्याचे दागिने व 1 लाख 4 हजार रुपयांची रोकड चोरट्याने लांबविल्याचे दिसून आले. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये नेकलेस, मंगळसूत्र, ब्रेसलेट, कडे, अंगठ्या आदींचा समावेश आहे.
चोरीची माहिती मिळताच माळ मारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते. अन्वर यांनी शुक्रवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. या घटनेने श्रीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.