उभ्या पिकात वन्यप्राण्यांचा सुरु असलेला हैदोस यावर वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी करत हंगरगा येथील शेतकरी वनविभाग कार्यालयात पोहोचले.
गुरुवारी वनविभागाचे अधिकारी शिवानंद मगदूम यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. रात्रंदिवस कष्ट करून सर्व शेतकरी पीक घेत आहेत. परंतु रात्रीच्यावेळी वन्यप्राणी शेतातील पिकावर आक्रमण करून पिकांचे नुकसान करत आहेत.
यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान तर होत आहेच शिवाय यामुळे मानसिक त्रासदेखील होत आहे. यासंदर्भात वनविभागाने लक्ष पुरवून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन शिवानंद मगदूम यांना सादर करण्यात आले.
बेळगावपासून केवळ १० किलोमीटर अंतरावर असलेल्या हंगरगा गावात रात्रीच्यावेळी वन्यप्राण्यांचा वावर सुरु आहे. हंगरगा गावात मोठ्या प्रमाणात शेती असून सध्या ऊस, मका, बटाटे, जोंधळा यासारखी पिके आली आहेत.
या पिकांमध्ये अनेक वन्यप्राणी येऊन पिकांचे नुकसान करत आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी हंगरगा गावातील शेतकरी करत आहेत.