हलगा -मच्छे बायपासला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवून केलेल्या पर्यायी मार्गाच्या मागणीची दखल प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी घेतली असून संबंधित पर्यायी मार्गाची पडताळणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी सायंकाळी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिले. हलगा -मच्छे बायपास रस्त्यांमुळे वर्षाला तीन पिके देणारी सुपीक जमीन शेतकऱ्यांकडून हिरावली जाणार आहे. परिणामी हे अल्पभूधारक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.
तेंव्हा हा बायपास रस्ता या सुपीक जमिनीतून न करता पडीक जमिनीतून करावा. यासाठी कोंडूसकोप्प, धामणे, येरमाळ, राजहंस गड, देसुर ते खानापूर या मार्गाचा विचार केला जावा अशी मागणी करून यामुळे 2 कि. मी. अंतर कमी होऊन सुमारे 50 टक्के निधीची बचत होईल, असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे पर्यायी मार्गाचा नकाशा देखील प्रादेशिक आयुक्तांना दाखविला.
नकाशा पाहून आणि शेतकरी नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रादेशिक आयुक्त बिश्वास यांनी पर्यायी मार्गाचा विचार केला जाईल असे सांगून या मार्गाची पडताळणी करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नायक, राजू मरवे, विलास घाडी, रमाकांत बाळेकुंद्री, महेश चतुर आदी उपस्थित होते.