जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या पाहणी दौऱ्याबाबत शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी साशंकता आणि नाराजी व्यक्त केली असून जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांबाबत म्हणावा तितका कळवळा नसल्याचे परखड मत व्यक्त केले आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज सकाळी वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्याचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांची मते जाणून घेतली. या पार्श्वभूमीवर बेळगाव लाइव्हशी बोलताना शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांचा आजचा पाहणी दौरा पाहता ते सुपीक शेत जमिनीचे होणारे नुकसान, शेतकऱ्यांची व्यथा अथवा बायपास रस्त्यासाठी आम्ही सुचवलेला पर्याय जाणून घेण्यासाठी आले होते असे मला वाटत नाही.
त्यांनी फक्त शेतकऱ्यांची मते जाणून घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तर फक्त लाख आणि कोटीची भाषा करत होते. ते प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्हाला एवढे लाख मिळतील, तुम्हाला एवढे कोटी मिळतील फक्त एवढेच सांगताना दिसत होते. यावरून जिल्हाधिकारी शेतकऱ्यांचे दुःख जाणून घ्यायला आले नव्हते तर शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार हे सांगायला आले होते असे वाटत होते, असे नायक यांनी सांगितले.
आम्ही नुकसान भरपाई पाहिजे असे कधीच म्हटले नाही. आमची मागणी ही आहे की हलगा ते मच्छे ऐवजी आम्ही कोंडुसकोप्प, झाडशहापूर आदी भागातून जो मार्ग सुचवला आहे तेथे हा बायपास रस्ता करावा. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले. एकंदर जिल्हाधिकाऱ्यांच्या आजच्या दौऱ्याबाबत आम्ही समाधानी नाही. कारण जिल्हाधिकारी शेतीवर शेतकऱ्यांबद्दल न बोलता फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि गॅझेट बद्दलच बोलत होते. लहान लहान शेतकऱ्यांच्या जीवनाबाबत त्यांनी अजिबात विचारणा केली नाही, अशी माहिती नायक यांनी दिली.
प्रशासन दबाव आणत असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आपण सर्वानी संघटीत राहून धाडसाने कायद्याच्या चौकटीत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवूया. आपण सर्व शेतकरी आपापसातील मतभेद विसरून एकजूट राहिलो तर निश्चितपणे विजय आपलाच आहे.
एकजुटीच्या जोरावर आपण आपली शेतजमीन वाचू शकतो. बेळगावातील आपले अस्तित्व टिकू शकतो. त्याचप्रमाणे राजकारणी, भ्रष्ट व्यवस्था आणि भू -माफियांना चांगली थप्पड लगाऊ शकतो, असे स्पष्ट करून प्रकाश नायक यांनी शेवटी समस्त शेतकर्यांना एकजूट राखण्याचे कळकळीचे आवाहन केले.