गोवावेस बसवेश्वर सर्कलनजीक लेक व्ह्यू हॉस्पिटल शेजारील नाल्यामध्ये महापालिकेच्या टँकरमधील ड्रेनेजचे मैलामिश्रित सांडपाणी सोडण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेकडून सकिंग मशीनद्वारे ड्रेनेजचे मैलामिश्रित सांडपाणी टँकरमध्ये भरून ते टँकर शहराबाहेर विशिष्ट ठराविक ठिकाणी रिकामे केले जातात. ड्रेनेजचे सदर अत्यंत दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याने ही खबरदारी घेतली जाते.
तथापि आज गुरुवारी सकाळी गोवावेस बसवेश्वर सर्कलनजीक लेक व्ह्यू हॉस्पिटल शेजारील नाल्यामध्ये महापालिकेच्या टँकरमधील ड्रेनेजचे मैलामिश्रित सांडपाणी सोडण्यात येत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. भरवस्तीच्या ठिकाणी आज सकाळी घडलेल्या या प्रकाराबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याच प्रमाणे कोणाच्या परवानगीने हा प्रकार केला जात आहे? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
टँकरमधील ड्रेनेजचे मैलामिश्रित सांडपाणी ज्या ठिकाणी सोडण्यात आले तो महात्मा फुले डबल रोड शेजारी नाला पुढे कांही अंतरावर झाड तसेच दगड -माती, केरकचरा पडून बुजला आहे. परिणामी घाण पाणी नाल्यात मोठ्या प्रमाणात तुंबून परिसरात आधीच दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
यातभर म्हणून या नाल्यात आता महापालिकेकडून मैला मिश्रीत ड्रेनेजचे सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे आसपासच्या नागरिकात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तरी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा सदर प्रकार तात्काळ थांबवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.