तब्बल 4 वर्षापूर्वी विमानतळाची धावपट्टी अधिक विस्तृत करून वाढविण्यात आल्यानंतर आजचा दिवस बेळगाव विमानतळासाठी अत्यंत संस्मरणीय ठरला जेंव्हा पहिल्या व्यवसायिक एअर बस विमानाचे या विमानतळावर लँडिंग झाले. इंडिगो ए -320 ही खास एअर बस केएलई – युएसएमच्या 132 मलेशियन विद्यार्थ्यांना घेऊन आज दुपारी बेळगाव विमानतळावर दाखल झाले.
बेळगावमध्ये आज पहिल्यांदाच आगमन होणाऱ्या दोन विशेष एअर बस विमानांपैकी एकाचे आगमन झाले आहे. मलेशियाहुन आलेल्या इंडिगो ए -320 एअरबसचे आज दुपारी 4 वाजता बेळगाव विमानतळावरील अग्निशामक दलातर्फे दोन्ही बाजूंनी आकाशात उंच पाण्याचे फवारे सोडून स्वागत करण्यात आले. सदर भव्य विमान कॉल आलमपुर होऊन चेन्नई मार्गे बेळगावला आले असून पुन्हा ते चेन्नईला रवाना होईल. त्याचप्रमाणे मलेशियाहून विद्यार्थ्यांना घेऊन येणारे आणखी एक एअर बस रात्री 8 वाजता बेळगाव विमानतळावर लँड होणार आहे.
कोरोनाविषाणू प्रादुर्भावामुळे शहरात शिक्षण घेणारे मलेशियन विद्यार्थी मायदेशी रवाना झाले होते. आता प्रादुर्भाव निवळल्यामुळे आपले शिक्षण पूर्ववत पुढे सुरु ठेवण्यासाठी हे विद्यार्थी आज पुन्हा बेळगावला परतत आहेत. बेळगावातील केएलई संस्था आणि मलेशियन विश्वविद्यालय यांच्यातील शैक्षणिक करारांतर्गत सुमारे 320 मलेशियन विद्यार्थी बेळगावात शिक्षण घेत आहेत. कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता वाढल्यामुळे गेल्या वर्षी एप्रिल 2020 मध्ये यापैकी बहुतांश विद्यार्थी माघारी आपल्या घरी मलेशियाला गेले होते. त्याचप्रमाणे उर्वरित विद्यार्थी बेळगावातच वास्तव्यास होते. कोरोना प्रादुर्भाव निवळून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यामुळे आता माघारी गेलेले 272 मलेशियन विद्यार्थी पुन्हा बेळगावात येत आहेत. त्यांच्यासाठी खास दोन एअर बस विमानांची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी दुपारी 4 वाजता आलेल्या विमानातून 132 विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि आता रात्री 8 वाजता येणाऱ्या विमानांमधून 140 विद्यार्थी-विद्यार्थिनी बेळगावात दाखल झाले
दरम्यान, बेळगाव विमानतळावर अशा पद्धतीने पहिल्यांदाच 180 आसन क्षमता असणारी एअर बस उतरली आहे. इंडिगो कंपनीचे ए -320 एअर बसच्या स्वरूपात बेळगाव विमानतळावर पहिल्यांदाच इतके मोठे विमान उतरवण्यात आले आहे. सदर विमानाच्या आगमन व उड्डाणामुळे भविष्यात बेळगावला एअर बस सेवा सुरू होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
बेळगाव विमानतळाचे 2016 -17 साली नूतनीकरण करतेवेळी मोठी विमाने उतरतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु तेंव्हापासून अद्याप एअर बस किंवा बोईंग सारखी प्रचंड मोठी विमाने या ठिकाणी उतरली नव्हती. आज प्रथमच एअर बस सारख्या विमानाचे बेळगाव विमानतळावर आगमन झाले आहे. इंडिगोच्या उपरोक्त दोन विमानांपैकी दुसरी एअर बस कौलालंपुर येथून बेंगलोर मार्गे बेळगावात दाखल होणार आहे. ही विमाने नॉन शेड्युल विमाने असल्याची माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली आहे.