कोरोना प्रादुर्भाव काळात समाजोपयोगी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हुबळी येथे बेळगावातील हेल्प फॉर नीडीचे प्रमुख सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांचा प्रजावाणी वृत्त संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
हुबळी येथील प्रजावाणी वृत्तपत्राच्या मुख्य कार्यालयामध्ये आज सोमवारी सकाळी आयोजित सत्कार समारंभामध्ये कोरोना प्रादुर्भाव काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या राज्यातील निवडक 8 संस्था व व्यक्तींना खास सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केएलई सोसायटीचे संचालक शंकरण्णा मुनवळ्ळी, माजी आंतरराष्ट्रीय ॲथलिट विलास नीलगुंद आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते बेळगाव येथील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन आणि हेल्प फॉर नीडी संघटनेचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सुरेंद्र अनगोळकर यांच्यासह त्यांना प्रत्येक कार्यात समर्थ साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी भाग्यश्री अनगोळकर यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.
अनगोळकर यांच्या हेल्प फॉर नीडी संघटनेने कोरोना प्रादुर्भाव काळात कोरोनामुळे मृत पावलेल्या एकूण 197 जणांवरील अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले. याखेरीज सुमारे 400 हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांना हॉस्पिटलमधून घरी, घरातुन हॉस्पिटल अशी सुखरूप ने -आण करण्याची जबाबदारी पार पाडली.
त्याचप्रमाणे कोरोना काळात सफाई कर्मचारी, पोलीस, सरकारी व खाजगी हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांचे अटेंडर अशा सुमारे 1 हजार जणांची दररोज जेवणाची व्यवस्थाही हेल्प फोर नीडीने केली होती. या कार्याची दखल घेऊन सुरेंद्र अनगोळकर यांचा वरीलप्रमाणे सत्कार करण्यात आला.