शेतकरी विरोधी अन्यायकारक कृषी कायदे तात्काळ रद्द करावेत, या आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांतर्फे आज गुरुवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानका समोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळी रेल रोको आंदोलनाच्या उद्देशाने आलेल्या शेतकरी नेत्यांसह सुमारे 30 हून अधिक शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.
केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरी विरोधी अन्यायकारक कृषी कायदे तात्काळ रद्द केले जावेत या मागणीसाठी आज गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्य रयत संघटना आणि कृषक समाजातर्फे कर्नाटक राज्य रयत संघाचे राज्याध्यक्ष चिन्नाप्पा पुजारी, बेळगाव तालुका अध्यक्ष राजीव मरवे आणि कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव रेल्वे स्थानकासमोर आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करण्याबरोबरच शेतकरी संघटनांच्या जय जयकारासह कृषी कायद्याचा निषेध करणाऱ्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. रेल रोको आंदोलन करण्याच्या उद्देशाने आलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी रेल्वेस्थानकात घुसू नये यासाठी पोलीस आणि प्रवेशद्वारावरच बॅरिकेड लावून त्यांना अडवले होते.
प्रारंभी 40 -50 च्या संख्येने असणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची संख्या हळूहळू वाढून शंभरच्या पुढे जाताच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. यावेळी चिन्नाप्पा पुजारी, सिद्धगौडा मोदगी, राजीव मरवे यांच्यासह सुमारे 30 हून शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.
कर्नाटक राज्य रयत संघ आणि कृषक समाजातर्फे छेडण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये शेतकरी नेते प्रकाश नायक, रवी सिद्धनावर, आप्पासाहेब देसाई, राघवेंद्र नाईक, अखीला पठाण, अनिल अनगोळकर आदींसह बहुसंख्य शेतकऱ्यांचा सहभाग होता. या आंदोलनानंतर शेतकरीविरोधी कृषी कायद्यांच्या विरोधात आणि ते रद्द केले जावेत या मागणीसाठी शेतकरी नेते माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रयत संघटनेच्या शेतकऱ्यांनी बेळगाव रेल्वे स्थानकासमोर ठिय्या आंदोलन छेडून निदर्शने केली.