केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी अन्यायी कृषी कायद्यांच्या विरोधात आणि संबंधित कायदे त्वरित मागे घ्यावेत या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या सर्व शाखांसह समस्त शेतकरी संघटनांतर्फे आज दुपारी हिरेबागेवाडी टोलनाका येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर रास्ता रोको आंदोलन छेडून चक्का जाम करण्यात आला.
केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरीविरोधी काळे कायदे त्वरित मागे घेतले जावेत या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून आज देशभरात रास्ता रोको अर्थात चक्का जाम आंदोलन छेडण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून कर्नाटक राज्य रयत संघटनेसह समस्त शेतकरी संघटनांतर्फे आज दुपारी 12 च्या सुमारास हिरेबागेवाडी टोलनाका येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. रास्तारोको करण्याबरोबरच शेतकरी नेते राजू मरवे यांच्यासह अन्य काही शेतकऱ्यांनी चक्क रस्त्यावरच घेतलेली लोळण सार्यांचे लक्ष वेधून घेत होती. राष्ट्रीय महामार्गावर सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ चाललेल्या या रास्ता रोकोमुळे मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला जवळपास 3 -4 कि. मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी, जयश्री गुरण्णावर, प्रकाश नायक, राजू मरवे, उमेश बिर्जे, राजू गाणगेर, अखीला पठाण आदींच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या रास्तारोको आंदोलनामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवला होता. त्यामुळे हिरेबागेवाडी टोलनाका परिसराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून परिस्थिती चिघळू नये यासाठी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने आंदोलन आटोपते घेण्यास भाग पाडले.
यासाठी पोलिसांनी तात्पुरते अटकसत्र देखील राबविले. शेतकऱ्यांच्या या रास्तारोकोमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहन चालक आणि प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.