मुंबईवर हक्क मागणाऱ्या कर्नाटकाच्या मागणीवर लहान मुलांनाही हसू येईल, असा टोला शिवसेना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला आहे. कर्नाटकाने मुंबईवर हक्क मागणे म्हणजे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागी आपल्याला पंतप्रधान करावे, अशी बालिश मागणी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि अखंड महाराष्ट्रासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे.
बलिदान पत्करले आहे. हौतात्म्य पत्करले आहे. सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा, यासाठी करत असलेल्या मागणीत तथ्य आहे. भाषिक आकडेवारीनुसार बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात सामील करावा ही मागणी योग्य आहे. आणि या मागणीत तथ्यदेखील आहे. परंतु मुंबई कर्नाटक सामील करण्याची मागणी हा निव्वळ विनोद आहे.
कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करते. अत्याचार करते. मागील काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात देखील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी उलट सुलट कृत्य केली. अशी कृत्ये करणाऱ्यांना त्यावेळी चांगलाच धडा शिकविण्यात आला आहे. आणि आताही शिवसेना धडा शिकविणाराच असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समिती करावा ही मागणी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी उचलून धरली आहे. १७ जानेवारी रोजी मराठी भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविला.
आणि त्यानंतर कर्नाटकात नेत्यांचा आणि कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांचा थयथयाट सुरु झाला. उलट सुलट आणि बेताल वक्तव्ये करून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुरु असलेल्या आटापिट्यावर आता महाराष्ट्रातील नेत्यांनीही जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.