अपघातात जवळपास दंडापासून पूर्णपणे तुटून पडलेला एका 5 वर्षीय बालिकेचा हात पूर्ववत तिच्या शरीराशी जोडण्याची यशस्वी शस्त्रक्रिया शहरातील विजय ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरमध्ये पार पाडण्यात आली असून आता हात पूर्णपणे बरा झाला असल्यामुळे सदर माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
तुटलेल्या हाताची शस्त्रक्रिया झालेल्या बालिकेचे नांव अफिया शेख (वय 5 वर्षे) असे आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, गेल्या 12 जून 2019 रोजी बसमधून प्रवास करत असताना अफिया शेख या बालिकेने बाहेर पडणारा पाऊस ओंजळीत झेलण्यासाठी आपला उजवा हात बसच्या खिडकीबाहेर काढला. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या एका वाहनाच्या धडकेने तिचा हात जवळपास दंडापासून तुटून पडला.
सदर अपघात घडताच सदर बालिकेला तात्काळ (1 तासात) शहरातील विजय ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर (व्हिओटीसी 24×7) या हॉस्पिटलमध्ये तुटलेल्या हातासह दाखल करण्यात आले. तेंव्हा प्रारंभी हॉस्पिटलचे मुख्य प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल माळमंडे यांनी बालिकेची चिकिस्ता आणि तपासणी केली. त्यानंतर हॉस्पिटलचे संचालक मुख्य वैद्य अधिकारी डॉ. रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध तपासण्या व परीक्षणअंती अपघातग्रस्त बालिकेचा तुटलेला हात जोडला जाऊ शकतो हा निष्कर्ष काढला.
तेंव्हा लागलीच शस्त्रक्रिया करून अफिया शेख हिचा तुटलेला हात पुन्हा तिच्या शरीराशी जोडण्यात आला. सदर अवघड शस्त्रक्रिया तब्बल 10 तास सुरू होती. डॉ. विठ्ठल माळमंडे, प्लास्टिक सर्जन डॉ. कौस्तुभ देसाई, पेडियाट्रिक ऑर्थोपिडिशियन डॉ. अरविंद हप्पन्नावर, भूलतज्ञ डॉ. श्रीधर काथवटे, श्रीधर कलकेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर अतिया शेखच्या हातावर वर्षभर उपचार सुरू होते. अत्यंत अचूक व काळजीपूर्वक केलेली शस्त्रक्रिया आणि उपचारामुळे अफिया हिचा तुटलेला हात वर्षभरात पुर्ववत जोडला गेला आहे. आता ती पूर्वीप्रमाणे आपल्या हाताची नैसर्गिक हालचाल करू शकते. आपल्या मुलीचा हात पूर्ववत केल्याबद्दल शेख कुटुंबीयांनी डॉ. रवी पाटील आणि संबंधित सर्व डॉक्टरांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दरम्यान, अपघात अथवा अन्य कांही कारणास्तव मनुष्याच्या शरीराचे एखादे बाह्यांग हात, पाय, बोटे वगैरे एखादा अवयव तुटून शरीरापासून विलग झाल्यास वेळीच केलेली शस्त्रक्रिया आणि उपचाराद्वारे तो पूर्ववत शरीराशी जोडला जाऊ शकतो, असे डॉ रवी पाटील यांनी स्पष्ट केले आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा अवयव तुटल्यास घाबरून न जाता प्रसंगावधान राखून तात्काळ संबंधित व्यक्तीला नजीकच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये हलवावे. मात्र तत्पूर्वी हॉस्पिटलला कल्पना द्यावी. याखेरीज तुटलेला अवयव घटनास्थळीच टाकून न देता तो स्वतः सोबत न्यावा.
जमल्यास तुटलेला अवयव स्वच्छ करून प्लास्टिक पिशवी अथवा एखाद्या डब्यातून बर्फामध्ये घालून आणावा. ही सर्व क्रिया त्वरेने झाल्यास संबंधित अवयव शस्त्रक्रियेद्वारे पुरवत शरीराशी जोडला जाऊ शकतो. कारण शरीराचा अपघातग्रस्त भाग आणि तुटलेला अवयवातील रक्तवाहिन्या जवळपास 3 तास जिवंत असतात त्यामुळे या कालावधीमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकते, अशी माहिती डॉ. रवी पाटील यांनी दिली.