जनतेच्या सूचना आणि तक्रारींसाठी पोलीस विभागाच्यावतीने जनस्नेही कार्यक्रम विविध पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत आयोजित करण्यात येत आहे. आज एपीएमसी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त रित्या सभा पार पडली.
जनसंपर्क सभेत नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचण्या ऐवजी पोलीस निरीक्षक जावेद यांच्या कार्याचेच कौतुक अनेक जणांनी केले त्यामुळे जन स्नेही कार्यक्रमाला उपस्थित डी सी पी विक्रम आमटे यांना अनेकदा तक्रारी समस्या सांगा असे आवाहन करावे लागले.
या सभेत एपीएमसी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या समस्यांवर नागरिकांनी पोलीस विभागाला सूचना केल्या. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक कोंडीच्या विषयावर सूचना करण्यात आल्या. तसेच केएलई रुग्णालय मार्गावर तसेच आझम नगर, सिव्हील हॉस्पिटल रोड वर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे, या समस्येवर लक्ष पुरवून तातडीने समस्या सोडविण्यासाठी सूचना करण्यात आल्या.
तसेच नागरिकांनी शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी कामकाजांतर्गत रखडलेली कामे आणि रस्त्यावरील खड्ड्याच्या समस्येविषयी देखील सूचना केल्या.
एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरे यांच्या कामाच्या पद्धतीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. डीसीपी विक्रम आमटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील जवळपास ३०० नागरिक या बैठकीला उपस्थित होते.