प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. कधी या विषयावर तर कधी त्या विषयावर अर्थहीन आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु केलेल्या कंगना राणावत वर बेळगावचे युवा वकील हर्षवर्धन पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
केंद्रसरकारने अंमलात आणलेल्या कृषी विधेयकाला जोरदार विरोध आहे. लाखो आंदोलनकर्ते केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत आहेत. विधेयकावरून दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर अभिनेत्री कंगना राणावतने वादग्रस्त विधान केले. आंदोलन करणारे शेतकरी हे नसून ते दहशतवादी असल्याचे मत कंगना राणावतने आपल्या ट्विटर वरून व्यक्त केले आहे. तसेच हे आंदोलनकर्ते देशात दुफळी माजविण्याचा प्रयत्न करत असून दुफळीमुले दुर्बल झालेल्या देशावर चीन सारखा देश सहज राज्य करू शकेल असेही कंगना राणावतने म्हटले आहे. या वादग्रस्त विधानावर संतापाची लाट उसळली असून कंगना विरोधात बेळगावमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
यासंदर्भात आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत युवा वकील हर्षवर्धन पाटील यांनी कंगना रानवातला अशी विधाने करण्यासाठी कोणी अधिकारी दिला? असा जाब विचारला आहे. कंगनाने केलेले हे वक्तव्य म्हणजे संपूर्ण देशातील शेतकरी, शेतकरी कुटुंबीय आणि संपूर्ण सैन्यदलाच्या अवमान असल्याचेही त्यांनी म्हटले. भारत हा कृषिप्रधान देश आहे. जय जवान, जय किसान सारख्या घोषणांनी भारत समृद्ध आहे.
भारतातील शेतकरी देश जोडण्याचे काम करतो. विभाजनाचे नाही. कंगना राणावतने केलेल्या बेजबाबदार विधानाचा मी निषेध व्यक्त करत आहे. शिवाय कंगना राणावतवर भादंवि १५३, १५३ (ए) , ५०३, ५०४, ५०५ (१), ५०५(बी,) ५०५(६), ५०५(२), अन्वये गुन्हा दाखल करून त्यांचे ट्विटर अकाउंट बॅन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवाय कंगना राणावतने संपूर्ण देशवासीयांची कायदेशीर माफी मागावी, अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयीही कंगना राणावतने उलट सुलट विधान केले. सध्या कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे कंगना राणावतवर गुन्हा दाखल करण्यात येईल का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, पोलीस दल हे स्वतंत्र कार्य करते. कायद्याच्या बाजूने कार्य करते. त्यामुळे सरकार कोणतेही असो, कोणाचेही असो, न्यायाच्या बाजूनेच पोलीस विचार करतील, आणि माझी तक्रार रीतसर नोंदवून घेतील. कायदा आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1321485531542370/