कोरोना प्रादुर्भावामुळे सुमारे वर्षभर प्रलंबित राहिलेल्या बारावीसह अकरावीच्या महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला अखेर आज 1 फेब्रुवारी 2021 पासून कोविड -19 संदर्भातील नियमांचे पालन करून पूर्ववत नियमित प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आज सोमवारी शहरातील शाळा महाविद्यालये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गजबजून गेलेली पहावयास मिळाली.
भारतासह जगभरात कोरोनाविषाणू प्रादुर्भावाने थैमान घातल्यामुळे गेल्या मार्च 2019 पासून शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली होती. तेंव्हापासून बेळगावसह राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या आवारामध्ये शुकशुकाटच होता. मात्र कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता कमी झाल्यामुळे आता आज सोमवार दि. 1 फेब्रुवारी 2021 पासून दहावी बरोबर इयत्ता नववीचे आणि महाविद्यालयांमधील बारावीबरोबरच अकरावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामुळे शहरात येईल विविध महाविद्यालय परिसरात आज सकाळी विद्यार्थी-विद्यार्थिनींची गर्दी झाली होती.
कोरोना प्रादुर्भावाची संकट पूर्णपणे टळले नसल्यामुळे मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर वगैरे मार्गदर्शक सूचीचे पालन करून अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील लिंगराज महाविद्यालय, आरएलएस महाविद्यालय, ज्योती पदवीपूर्व महाविद्यालय, जीएसएस महाविद्यालय, आरपीडी महाविद्यालय, गोगटे महाविद्यालय आदी महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मास्क परिधान केला आहे की नाही याची तपासणी करण्याबरोबरच प्रत्येकाचे टेंपरेचर स्क्रीनिंग करून त्यांना रांगेत आत सोडले जात होते.
महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अकरावीचे विद्यार्थी आयुष्यात पहिल्यांदाच महाविद्यालयीन जीवनाचा अनुभव घेणार असतात. महाविद्यालयाचा परिसर त्यांच्यासाठी नवा असतो. त्यामुळे ते गोंधळून जाण्याची शक्यता गृहीत धरून लिंगराज महाविद्यालय तसेच अन्य कांही महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक वर्ग जातीने आवारात उपस्थित राहून नव्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांचे वर्ग नेमक्या कोणत्या बाजूला, कोणत्या ठिकाणी आहेत याबाबत मार्गदर्शन करताना दिसत होता.
ऑनलाइन, ऑफलाइन, विद्यागम अशा अनेक पद्धतीने कांही इयत्तांचे वर्ग भरविण्यात येत असताना गेल्या जानेवारी 2021 पासून दहावी आणि बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले आहेत. आता आजपासून नववी आणि अकरावीचे वर्गही नियमितपणे सुरू झाले आहे. परिणामी शहरातील पदवीपूर्व महाविद्यालयं आणि माध्यमिक शाळा विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अधिकच गजबजून गेल्या आहेत.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1316485985375658/