दोन वेळा मुदतवाढ मिळालेली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सभागृहाची निवडणूक घेण्याच्या दृष्टीने संरक्षण खात्याने हालचाली सुरू केले असून येत्या दि. 11 फेब्रुवारी रोजी सभागृह बरखास्त करण्याचा आदेश जारी केला आहे. परिणामी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डवर प्रशासक नियुक्त केला जाणार असल्याचे समजते.
देशातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सभागृहाची 5 वर्षाची मुदत मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये संपुष्टात आली होती. मात्र कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर टाकून सभागृहाला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत वाढ प्रारंभी सहा महिन्यासाठी देण्यात आली होती. तथापी त्या सहा महिन्यातही कोरोना आटोक्यात आला नसल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका संरक्षण खात्याने घेतल्याच नव्हत्या. देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून संरक्षण खात्याने 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत पुन्हा 6 महिने वाढवली होती. ही मुदतवाढ या फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे.
तिसऱ्यांदा मुदत संपल्यामुळे संरक्षण खात्याने अधिसूचना जारी करून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे लोकनियुक्त सभागृह येत्या 11 फेब्रुवारी रोजी बरखास्त करण्याचा आदेश जारी केला आहे. आगामी एक वर्षाच्या कालावधीसाठी हे सभागृह बरखास्त राहणार असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणुका घेण्याच्या दृष्टीने संरक्षण खात्याने कोणतीही तयारी केली नसल्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.