नियमावलीच्या पलीकडे जाऊन अवैधरित्या देण्यात आलेली बीपीएल कार्ड त्वरित रद्द करावी. तसेच अवैधरित्या बीपीएल कार्ड वापरणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याची सूचना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग मंत्री उमेश कत्ती यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
आज आयोजिण्यात आलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
लोकसंख्येहून अधिक कार्ड वितरण करण्यात आल्यासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. आरोग्य भाग्यसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी बोगस कागदपत्रे सादर करून बीपीएल कार्ड मिळविली आहेत. ही सर्व बोगस बीपीएल रेशन कार्ड त्वरित रद्द करण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. तसेच रॉकेल पूवठ्यासंदर्भातही येत्या एप्रिल महिन्यापर्यंत कार्यवाही करण्यात येण्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. स्थानिक पातळीवर गहू आणि तांदूळ खरेदी करण्याच्या उपाययोजनांवर लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक घरोघरी भेट देऊन जनतेच्या खाद्यपदार्थांच्या गरजेविषयी सर्वेक्षण करण्याचे निर्देशही उमेश कत्ती यांनी दिले.
या बैठकीला उपस्थित असलेले राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी बोगस कागदपत्रे सादर करून बीपीएल रेशनकार्ड मिळविलेल्यांविरोधात कारवाई करून अशी बीपीएल कार्ड रद्द करण्याची सूचना त्यांनी दिली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनीही अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात कायमस्वरूपी मोहीम हाती घेण्याविषयी सल्ला दिला.
या बैठकीला उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके, उपविभागाधिकारी युकेश कुमार, अशोक तेली, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते