“भुत” म्हंटलं की अनेकांची पाचावर धारण बसते. मात्र भूतं खरोखर अस्तित्वात आहेत की नाहीत? हा एक असा प्रश्न आहे ज्याचे निश्चित उत्तर नाही. मात्र प्रसिद्धीची पर्वा न करता यावर चर्चा घडत असतात. हॉररच्या नांवाने चित्रपट मनोरंजनात्मक करण्यासाठी भुतांचा आधार घेतला जातो. अशा परिस्थितीत शहरातील एका 32 वर्षीय युवकाने भूतांबाबतचे सत्य शोधून काढण्याच्या कार्याला वाहून घेतले आहे. गेल्या कांही वर्षापासून तो या विचित्र मोहीमेवर असून अद्याप तरी त्याला सत्य शोधून काढण्यात यश आलेले नाही. या युवकाचे नांव आहे वरुण कारखानीस.
छायाचित्रकार आणि प्राणी दया कार्यकर्ता असणारा वरूण बेळगाव पशु कल्याण संघटनेचा (बावा) सदस्य आहे. भुताच्या साध्या उच्चारानेही अनेकांच्या अंगावर भीतीने काटा येतो. मात्र प्रचंड जिज्ञासेपोटी वरुण कारखानीस भलेभले लोक जे धाडस करण्यास धजावणार नाहीत असे भुतांचे अस्तित्व शोधून काढण्याचे धाडस करत आहे. वरूण लवकरच एक इंग्रजी पुस्तक लिहिणार असून त्यासाठी त्याचे हे भुतांसंदर्भातील संशोधन सुरू आहे.
“भुतं” ही स्मशानात आणि ओसाड घरे -एकांतातील अस्ताव्यस्त इमारती अशा ठिकाणी आढळतात असा सार्वत्रिक समज आहे. वरुण कारखानीस अशा भयावह ठिकाणी अनेक रात्री घालवत असतो. तथापि आपल्या मोहिमेला अद्याप यश आलेले नाही असे वाडवडील पूर्वजांकडून भुतांच्या गोष्टी ऐकत आलेल्या वरुणने सांगितले. तसेच भूत हे एक वास्तव आहे की फक्त कल्पना? असा प्रश्न फेसबुकवर “बेलगाम गोस्ट डायरीज” या नांवाने पेज ओपन करणाऱ्या वरूणने उपस्थित केला आहे. बेलगाम गोस्ट डायरी या पेजवर तो नेहमीच आपल्या संशोधनातील प्रगतीची माहिती देत असतो. आत्तापर्यंत अनेकांनी भुताचा नाद सोडण्यासाठी वरुणचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यामुळे नाउमेद होण्याऐवजी वरूण अधिक चिकाटीने अंधाराच्या गर्तेत जाऊन आपले लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे.
जी घरे, इमारती आणि स्मशानं भुताने पछाडलेली आहेत असे सांगितले जाते, अशा ठिकाणी मी खास गोप्रो कॅमेरा, दिवा, टॉर्च आणि अन्य साधने स्वतःसोबत घेऊन जातो. परंतु आजतागायत माझा एकाही भूताशी सामना झालेला नाही असे वरुण सांगतो. भुतांच्या बाबतीत आपल्या अभ्यासाची तीव्रता अधिक वाढविण्यासाठी येत्या कांही दिवसात “भूत शिकार” करणारी इमेजिंग कॅमेरा, एमईएफ अशी अन्य प्रगत साधने खरेदी करण्याची वरुणची योजना आहे. भूत हे सत्य की नुसता कल्पनाविलास? हे शोधण्याच्या वरूण कारखानीस याच्या मोहिमेत त्याला त्याचे मित्र शिवराम शहापूरकर, श्रीधर जोशी, भुवन, अरिहंत आणि अन्य कांही जणांचे सहकार्य लाभत असते. त्याचा भुताचा अभ्यास आणि संशोधनामध्ये काळ्या जादूचा (ब्लॅक मॅजिक) देखील समावेश आहे. “ब्लॅक मॅजिक” हा आपल्या अभ्यासाचा एक भाग आहे असे वरुणाला वाटते.
वरूण कारखानीस आणि त्याच्या मित्रांनी उद्यमबाग, व्हॅक्सिन डेपो आदी बऱ्याच ठिकाणच्या भुताचे अस्तित्व आहे असा समज असणारे बंगले आणि वास्तूंमध्ये वास्तव्य करून अनेक रात्री जागून काढल्या आहेत. मात्र त्यांना कुठेच भुताचा अनुभव आलेला नाही. ब्लॅक मॅजिकचा एक भाग असणाऱ्या मृतात्म्यांना निमंत्रित करण्याच्या “प्लांचेट” या पद्धतीमुळे गेल्या 2007 साली वरुण कारखानीस भूत शोधण्याचे असामान्य कार्य करण्यास प्रेरित झाला.
अनेक लोकांनी मला भूतांचा अनुभव सांगितला आणि मला वेड्यात काढले. तसेच संशोधनाच्या नांवाखाली मृतात्मे अर्थात भुतांशी खेळण्याचा धोका पत्करू नकोस, असा सल्ला देखील दिला. परंतु मला त्यांचे पटले नाही आणि म्हणूनच कसा का असेना पण माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी मला पुरावा मिळवावयाचा आहे. यासाठीच मी आता भूत शिकार करणारी साधने खरेदी करणार आहे, असे वरूण कारखानीस याने सांगितले, जो भुताचे अस्तित्व मान्य ही करत नाही आणि भूतं अस्तित्वात आहेत याचे समर्थनही करत नाही.