मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे आता बेळगाव तालुका पंचायत कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यांची नजर कामकाजावर असणार आहे.
तालुका पंचायत कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रस्तावाला ता. पं. कार्यकारी अधिकारी मलिकार्जुन कलादगी यांनी हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार आता कामाला सुरुवात झाली असून संपूर्ण तालुका पंचायत कार्यालयात पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सदर कार्यालयातील गैरप्रकारांवर नजर ठेवून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी हे सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
ता. पं. कार्यालयामध्ये ठराविक मोक्याच्या ठिकाणी हे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मागील अनेक वर्षापासून तालुका पंचायतमध्ये सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी करण्यात येत होती. मात्र निधी नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
आता तालुका पंचायतमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. या कॅमेऱ्यांमुळे गैरप्रकारांना आळा बसणे याबरोबरच भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर एक प्रकारचा वचक राहणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.