निवडणूक आली की सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये मतमतांतरे व भेद निर्माण होतात, हे सर्व थांबले पाहिजे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला सर्वांनी संघटित उत्तर देणे हीच खरी शिवसेनेच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले.
मुंबई येथे 8 फेब्रुवारी 1969 रोजी बेळगाव सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज सकाळी शहरातील सम्राट अशोक चौक येथे पार पडला. याप्रसंगी बोलताना शुभम शेळके यांनी नेहमीप्रमाणे आपले परखड विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी हौतात्म्य पत्करलेल्या शिवसैनिकांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
म. ए. समिती आणि म. ए. युवा समितीतर्फे शिवसेनेच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना शुभम शेळके म्हणाले की, बेळगाव, कारवार बिदर, भालकीसह समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांची संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्याची तीव्र इच्छा आहे. सीमा लढ्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. संयुक्त महाराष्ट्रात सामील होणे हे स्वप्न असणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये निवडणुका आल्या की मतमतांतरे होतात, मतभेद निर्माण होतात हे सर्व थांबले पाहिजे.
मुळात सीमा भागात निवडणूक लढवणे हा महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेचा उद्देश नाही संयुक्त महाराष्ट्रात सामील होणे हे त्यांचे एकमेव ध्येय आहे. यासाठी आपण सर्वांनी संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्यासाठी संघटितपणे लढूया. आपण प्रशासनाला दाखवून दिले पाहिजे की आम्ही कायद्याच्या चौकटी बाहेर कांहीही करत नाही आहोत. घटनेने जे अधिकार दिले आहेत ते मिळवण्यासाठी आम्ही झगडत आहोत. थोडक्यात सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला संघटित उत्तर देणे हीच शिवसेनेच्या हुतात्म्यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे शुभम शेळके यांनी शेवटी स्पष्ट केले.
माजी ता. पं. सदस्य कृष्णा हुंदरे यांनी सीमाप्रश्नी 67 शिवसैनिकांनी आपले बलिदान दिल्याचे सांगून हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे सीमाभागातील मराठी जनतेची खरी कळकळ होती असे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सध्याचे शिवसेनेचे विद्यमान सरकार सीमा प्रश्नाची निश्चितपणे तड लावेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेनेचे सीमाभागातील नेते अरविंद नागनुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील उपमहापौर रेणू किल्लेकर, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर आदींसह बेळगाव शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.