आगामी लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख संजीव कुमार हे उपस्थित होते. या बैठकीनंतर संजीव कुमार आणि जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली.
१८ वर्ष पूर्ण झालेल्या युवावर्गाने आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज करावेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी माहिती संजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यासोबतच अपंग, वयोवृद्ध आणि सैन्यदलात असणाऱ्या मतदारांसाठी तसेच कोरोना ग्रस्त रुग्ण मतदारांसाठी विशेष पोस्टल मतपत्रिकेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या नव्या मतदार यादीनुसार एकूण ३८५७९८२ मतदारांची नावे समाविष्ट आहेत. यापैकी १९५२१६० पुरुष मतदार तर १९०५८२२ महिला मतदार आहेत. महिला मतदारांचे प्रमाण कमी असून याबाबतीत कारणे शोधून तपासणी करून सुधारणा करण्यात येण्यासंबंधी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
आगामी निवडणुकीसाठी मतदार ओळखपत्र वितरित करण्यात येण्यासंबंधीही त्यांनी सूचना केल्या. आतापर्यंत ४२१२३ मतदारांना ओळखपत्र वितरित करण्यात आली असून उर्वरित मतदार ओळखपत्र लवकरात लवकर देण्यात यावीत, तसेच तरुण उमेदवारांची संख्या मतदानाकडे वाढविण्यासंबंधी प्रयत्न करण्यात यावेत, यासंबंधीही सूचना करण्यात आली. सध्या ४५३८० तरुण मतदार आहेत. मतदार यादीनुसार लक्षात घेता ही संख्या खूप कमी आहे. यादृष्टीने नव्या मतदारांचा कल मतदानाच्या बाजूने वाढविण्यासंबंधी प्रयत्न करण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
मतदार यादीत कोणत्याही पद्धतीचा बदल करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. अर्ज माघार घेण्याच्या तारखेपर्यंत मतदार यादीत बदल करता येऊ शकतो. १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नव्या मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी. आपले नाव मतदार यादीत नसेल किंवा कोणत्याही कारणास्तवबनाव वागले गेले असल्यास, तात्काळ संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संजीवकुमार यांनी केले.
या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन आदींसह इतर उपस्थित होते.