इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) नोव्हेंबर २०२० मध्ये घेतलेल्या चार्टर्ड अकौंटन्सीच्या अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये बेळगावमधील १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बेळगावमधील नीरज कुलकर्णी, प्रशांत पाटील, विनायक जाधव, संजीव अयाचित, प्रकाश शिंदे, मेघा तबक, कीर्ती गुमास्ते, श्रीशैल हळींगली, नवीन बी., प्रतीक कब्बूर, सिद्धिका मिरजवाले, आतिष हिंडलगेकर, राघवेंद्र मुळे, संगीता, मल्लिकार्जुन गिरी अशा १५ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या विद्यार्थ्यांना बेळगावमधील रवींद्र पोतदार, समीर अनवेकर, एम. डी. चौगुले, एस, जी. अध्यापक, आर. एस. मुंदडा, अँथनी डिसोझा, संबरगीमठ, चतुर्वेदी, शाह, टी. आर. भावे, कंदेलवाल जैन, जी. एल. वाली अशा नामांकित चार्टर्ड अकाउंटंट्सचे मार्गदर्शन लाभले आहे.
बेळगावमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असून, या परीक्षांचा निकालही दिवसेंदिवस वाढत असल्याचे बेळगाव शाखेचे व्यवस्थापक सीए सतीश मेहता आणि सीए एम. एस. तिगडी यांनी सांगितले.
या परीक्षांच्या निकालानंतर ‘बेळगाव लाईव्ह’ने नवे चार्टर्ड अकाउंटंट आतिष हिंडलगेकर यांच्याशी बातचीत केली. यावेळी आतिष हिंडलगेकर म्हणाले, कि चार्टर्ड अकौंटंन्टचा अभ्यासक्रम हा इतर अभ्यासक्रमांपेक्षा खूपच वेगळा आहे. लोकसेवा आयोगासह इतर अनेक स्पर्धा परीक्षा आहेत. प्रत्येक परीक्षेसाठी जिद्द आणि चिकाटी महत्वाची आहेच. पण चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी आपल्या वैयक्तिक गोष्टींनाही फाटा द्यावा लागला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या परीक्षेत १०० मधील केवळ १५ टक्के विद्यार्थीच हा टप्पा पार करू शकतात. अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण सुरु झाल्यापासून वैयक्तिक समारंभानंदेखील उपस्थित राहता येत नाही, इतक्या व्यस्त वेळापत्रकाला सामोरे जावे लागले. हा टप्पा पार करताना अनेकवेळा आपण पडलो.
परंतु कोणत्याही परिस्थितीत चार्टर्ड अकाउंटंट होणारच हा निर्धार करून पुन्हा त्याच जोमाने उठून आपण उभा राहिलो आणि हा टप्पा पार केला. आई वडिलांनी आपल्या मुलाने सीए होण्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नासाठी मी अनेक रात्री जागून काढल्या. नोकरी सांभाळत अभ्यासाकडे लक्ष देऊन परीक्षा दिली.
अपार मेहनत, कष्ट आणि जिद्द या गोष्टीमुळे आज मी चार्टर्ड अकाउंटंट झालो, याचे मला समाधान आणि आनंद आहे. माझ्या या यशात आई – वडील आणि काकांनी दिलेला पाठिंबा आणि संजीव अध्यापक तसेच राजेंद्र मंडोळकर यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे मत आतिष हिंडलगेकर यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना व्यक्त केले.