बेळगावची अपेक्षापूर्ती : उडान अंतर्गत 13 पैकी 12 मार्ग कार्यान्वित
गेल्या 25 जानेवारी 2019 रोजी उडान -3.0 योजनेअंतर्गत हवाई मार्गांची झालेली घोषणा बेळगाववासीयांसाठी आनंदाचा क्षण ठरली. कारण उडान अंतर्गत अन्य कोणत्याही शहरांपेक्षा बेळगावसाठी सर्वाधिक 13 मार्ग मंजूर झाले.
एकेकाळी जेंव्हा स्पाइस जेटची सर्व विमान सेवा अन्यत्र वळविण्यात आली, तेंव्हा बेळगाववासीय अत्यंत चिडले होते. यातूनच विमानसेवा पूर्ववत करण्यासाठीच्या लढ्याला बळ मिळाले. याचवेळी ॲक्वसचे सीईओ अरविंद मेल्लीगेरी यांनी ट्विटरवर “बेळगाव विमानतळ (आयएक्सजी) वाचवा” मोहीम छेडली आणि या मोहिमेच्या स्वरूपात जणू कृपादृष्टी झाली. बेळगाव विमानतळ वाचवा मोहिमेच्या माध्यमातून उठवलेला आवाज थेट नवी दिल्लीतील उच्चपदस्थांपर्यंत पोहोचला. याखेरीज नवी दिल्ली येथील संबंधित मंत्री आणि नागरी विमानोड्डाण मंत्रालयाच्या सचिवांची भेट घेण्यासाठी बेळगावहून शिष्टमंडळ रवाना झाले. त्यांनी बेळगावचा उडान -3 योजनेमध्ये समावेश होणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले.
कोरोना प्रादुर्भाव काळात कांही महिन्याच्या खंडानंतर बेळगावमधून मर्यादित प्रवासी संख्येसह पुन्हा सुरू झालेली विमानसेवा अल्पावधीत फक्त पूर्ववतच झाली नाही तर बेळगाव विमानतळाने सर्वाधिक प्रवासी संख्या आणि विमान फेर्यांच्या आधारे राज्यातील तिसर्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ होण्याचा बहुमान देखील मिळविला आहे. यामध्ये बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. त्यांनी बेळगावच्या सर्वसामान्य नागरिकांचा आवाज विमान कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयापर्यंत पोहोचविण्याचे काम मोठ्या आत्मीयतेने केले. स्थानिक प्रतिभेला विमानतळावर वाव देण्यासाठी देखील ते नेहमी पुढाकार घेत असतात. आता बेळगावला मंजूर झालेल्या 13 मार्गांपैकी जयपूरच्या फक्त एका हवाई मार्गाची स्टार एअरकडून घोषणा होऊन तो कार्यान्वित होणे बाकी आहे.